पुण्यातील मुकुंद भवन ट्रस्टने बनावट कागदपत्रांच्या आधारे ७९ एकर जमीन हडप केल्याच्या तसेच या गैरव्यवहारात सरकारी यंत्रणाही मदत करीत असल्याच्या आरोपांची गंभीर दखल घेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी या वादग्रस्त जमिनीवर सुरू असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या बांधकामांना अंतरिम स्थगिती दिली आहे. पंचशील टेकपार्क, डीबी रियालिटी आणि मुकुंद भवन ट्रस्ट या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या बांधकामांना स्थगिती देत खडसे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीची कोंडी केल्याची चर्चा आहे.

येरवडा भागातील ३२५ एकर जमिनीच्या मालकीचा वाद गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची भागीदारी असलेल्या कंपनीने कोटय़वधी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात केला होता. त्यानुसार पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी या घोटाळय़ाची चौकशी करून वादग्रस्त जमीन ही सॉइट ग्रॅण्ट प्रकारातील असल्याचा निर्वाळा देत या व्यवहारात कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचेही त्यांनी शासनास कळविले होते. मात्र, माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी हा अहवाल शासनाची दिशाभूल करणारा आणि आरोपींना मदत करणारा असल्याचा आरोप करीत १४ सप्टेंबर रोजी महसूलमंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.