मुदत संपलेले २३५ भूखंड परत घेऊन धोरणाचा फेरविचार; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला शह

उद्याने आणि मैदानांच्या खासगीकरणाचा किंवा दत्तकविधानाच्या महापालिकेच्या निर्णयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देत मुदत संपलेले २३५ भूखंड तात्काळ परत घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना शुक्रवारी दिले. धोरणाच्या फेरविचाराचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेचा विरोध लक्षात घेऊन आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदींनीही या धोरणाला जोरदार विरोध केल्याने भाजपने घूमजाव करीत भूमिका बदलली आणि मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याने त्यांनी अंमलबजावणी स्थगित केली.

महापालिकेने मोकळ्या जागा, मैदाने, क्रीडांगणे आदी जागा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय बुधवारी घेतल्यावर त्याविरोधात विरोधकांमध्ये आणि जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्ताधारी शिवसेना व भाजपने बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयास तीव्र विरोध केला. आंदोलनेही सुरू झाल्याने आणि जनतेमध्येही असंतोष असल्याचे दिसून आल्याने भाजपने घूमजाव करीत मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी सायंकाळी विमानतळावर तातडीने भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, आमदार अमित साटम, योगेश सागर, मनोज कोटक आदींनी मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. तेव्हा फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना या धोरणाचा फेरविचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ‘धोरणाबाबत मुंबईकरांच्या मनात शंका आहेत आणि आपल्या खुल्या जागा बळकावल्या जातील, अशी भीती आहे,’ असे मत व्यक्त करीत मुदत संपलेले २३५ हून अधिक भूखंड परत घ्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्तांना दिले. या धोरणानुसार कोणालाही मोकळे भूखंड यापुढे देण्यात येऊ नयेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना व भाजपमध्ये खणाखणी होत असून शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. मोकळ्या जागा आणि मैदानांच्या प्रकरणी जनमत विरोधी जात आहे हे लक्षात येताच पलटी खात भाजपने सगळे खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला. भूखंडांच्या खासगीकरणाचा शिवसेनेचा डाव मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपने रोखला, असा संदेश जनतेमध्ये जाण्यासाठी ही राजकीय खेळी करण्यात आली. त्यामुळे या धोरणावर एकाकी पडलेल्या शिवसेनेची पंचाईत झाली आहे.  दरम्यान, महापालिकेनेच उद्याने, क्रीडांगणे विकसित करावीत, अशी कायदेशीर तरतूद करण्याची मागणी करणारे खासगी विधेयक अ‍ॅड. शेलार यांनी विधानसभेत मांडले असून आगामी अधिवेशनात त्यावर निर्णय अपेक्षित आहे.

मैदान बचाव’साठी  ‘मनसे’ सरसावली!

मुंबईतील मोकळी मैदाने आणि झाडे हा मुंबईचा श्वास असल्याने मैदाने व झाडे वाचविण्यासाठी नागरिकांना एकत्र आणण्याकरिता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा पालिकेतील शिवसेना-भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी राजकारणविरहित मोहीम सुरू करण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे, अशी घोषणा त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही या धोरणास विरोध केला आहे.