दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याचा निषेधार्थ राज्यभर आंदोलने सुरू असताना शिवसेनेने आता या वादात उडी घेतली आहे. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आंबेडकर भवनाच्या पुनर्विकासाला स्थगिती दिली आहे. त्याबाबतचे आदेश देखील आंबेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

वाचा: आंबेडकर भवनाचा वारसा जपणार की नाही?

आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवना’च्या इमारतीचा ७० टक्के भाग २४ जूनच्या मध्यरात्री अडीजच्या सुमारास बुलडोझर चालवून पाडण्यात आला होता. त्यामुळे ‘दी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’चे सदस्य आणि आंबेडकर कुटुंबियांतील वाद अधिक तीव्र झाला. राज्यभर आंदोलने सुरू झाली. नुकतेच काही दिवसांपूर्वी स्नेहल आंबेकर आणि शिवसेनेच्या आमदार डॉ.नीलम गो-हे यांनी आंबेडकर भवनाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या पुनर्विकासासाठी पालिकेकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचा गौप्यस्फोट महापौर स्नेहल आंबेकर यांनी यावेळी केला होता.

वाचा: …तर ‘वर्षा’वर बुलडोझर फिरविण्यास मी मोकळा!

‘आंबेडकर भवन’ पाडून त्या जागी १७ मजली इमारत बांधण्यात येणार होती. मात्र, महापौरांच्या निर्णयामुळे पुनर्विकासाला आता स्थगिती मिळाली आहे. या इमारतीमधील जागा व्यावसायिकांना विकण्याचा डाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.