17 February 2020

News Flash

अखंड ब्रह्मांडात रमणारा मित्र 

डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. शशिकुमार चित्रे यांनी रंगविलेली स्मृतिचित्रे

स्टीफन हॉकिंग यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. शशिकुमार चित्रे यांनी रंगविलेली स्मृतिचित्रे

विश्वाची निर्मिती कशी झाली.. आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात.. असे गूढ न उकलेले प्रश्न प्रत्येक जिज्ञासू व्यक्तीला कधी ना कधी पडून गेले असतात. पण या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास फारच कमी लोक घेतात. यातीलच एक म्हणजे स्टीफन हॉकिंग.

विसाव्या शतकातील न्यूटन अशी त्यांची विशेष ओळख. पण ती वैज्ञानिक म्हणून. एक मित्र म्हणूनही ते तितकेच जिज्ञासू मानले जातात. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना ‘एएलएस’ आजाराने ग्रासले आणि आता ते केवळ दोन वष्रेच असे डॉक्टरांनी सांगितले. पण ब्रह्मांडाची उकल करण्याची त्यांची जिज्ञासा कमी होत नव्हती आणि त्याच जिद्दीने ते आज वयाची ७५ वष्रे पूर्ण करीत असल्याचे त्यांचे मित्र सांगतात.

डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. शशिकुमार चित्रे हे केंब्रिज विद्यापीठात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असताना १९६१ मध्ये स्टीफन यांनी ऑक्सफोर्डहून पदवी घेऊन पुढच्या शिक्षणासाठी तेथे प्रवेश मिळवला. त्या वेळेस इंग्लंडमध्ये विद्यापीठात विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्याची प्रथा होती. मात्र स्टीफनने पहिल्या दिवसापासून रंगीबेरंगी कपडे घालण्यास सुरुवात केली. यामुळे असे कपडे घालणारा विद्यार्थी म्हणून त्याची ओळख झाल्याचे डॉ. चित्रे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या फिनिक्स इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील कोपऱ्याच्या खोलीत मी माझ्या मार्गदर्शक डॉ. मिशेल यांच्यासाबेत काम करीत असायचो. त्याच्या बाजूच्या खोलीतच स्टीफन डॉ. डेनीस शामा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चा अभ्यास करू लागला. ऑक्सफोर्डमधून आलेल्या स्टीफनची विविध विषयांवर चर्चा व्हायची. आम्ही एकत्रित ‘क्रॉक’ खेळायचो.

१९६३ मध्ये माझे पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. मी परत भारतात यायला निघालो तेव्हा मी सगळय़ांना भेटलो, मात्र तेव्हा स्टीफन जागेवर नव्हता. मी जिने उतरत असताना मला जिन्यात भेटला. तेव्हा तो मला म्हणाला, मी आता इजिप्तला जाणार आहे. मी त्याचे अभिनंदन केले. तेच मी त्याला शेवटचे स्वत:च्या पायावर उभे असलेले पाहिल्याचेही चित्रे म्हणाले. यानंतर १९६५ मध्ये मी पुन्हा केंब्रिजमध्ये गेलो तेव्हा स्टीफनला व्हीलचेअरवर पाहिले. त्याची जगण्याची जिद्द प्रचंड होती. शरीर साथ देत नसले तरी तंत्रज्ञानाची साथ घेऊन तो उभा राहत होता. त्याने संपूर्ण लक्ष आपल्या संशोधनाकडे वळविले आणि तो विविध गूढ उकलण्यात मग्न राहिल्याचेही ते म्हणाले. १९८० मध्ये पुन्हा एकदा मला केंब्रिजला जाण्याचा योग आला तेव्हा स्टीफनने मला त्याच्या घरी बोलावले. मी व माझा परिवार असे आम्ही त्याच्या घरी गेलो. तेथे त्याने त्याच्या धाकटय़ा मुलाला माझ्याशी ‘क्रॉक’ खेळायला सांगितले. म्हणजे आमच्या केंब्रिजमधील खेळाची आठवण त्याने या वेळी करून दिल्याचे चित्रे यांनी नमूद केले.

पुढे २००० मध्ये जेव्हा स्टीफन मुंबईत टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेत आला तेव्हा त्याने मुंबई फिरायची इच्छा व्यक्त केली. त्या वेळेस महिंद्राने त्याची व्हीलचेअर वाहून नेणारी खास गाडी उपलब्ध करून दिली. आम्ही मरिन ड्राइव्ह, मलबार हिल परिसर फिरलो. मग ताजमध्ये जाऊन चहा घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्या वेळेस माझ्याकडे केवळ ३०० रुपये होते. मी, स्टीफन व सोबत आणखी दोघे जण होते. या सर्वाचा चहा ३०० रुपयांत कसा होणार, हा प्रश्न मला पडला. मग मी तेव्हाचे ताजचे व्यवस्थापक कृष्णकुमार यांना फोन केला. त्यांनी केवळ चहाचीच नव्हे तर जेवणाची आणि स्टीफनच्या राहण्याची सोय केल्याची आठवण चित्रे यांनी सांगितली. इतकेच नव्हे तर आम्ही जेवत असलेल्या ठिकाणी खुद्द रतन टाटा आले व ते स्टीफनला भेटले. स्टीफन यांना इथे आणून तुम्ही माझा दिवस अविस्मरणीय केल्याचे भावोद्गार टाटा यांनी काढल्याचेही चित्रे यांनी सांगितले. स्टीफनला दुर्धर आजाराने ग्रासले तरी त्याने संशोधनाची कास सोडली नाही. त्याच्या या आजारामुळे त्याला माध्यमांमध्ये सहानुभूती मिळत असल्याची भावना अनेकांच्या मनात होती. पण प्रत्यक्षात स्टीफनचे भौतिकशास्त्रातील तसेच त्याच्याशी संबंधित विषयांतील योगदान हे अमोलिक असल्याचे चित्रे म्हणाले. यामुळेच न्यूटनसारख्या वैज्ञानिकाने काम केलेल्या केंब्रिज विद्यापीठातील ‘ल्यूकॅशियन चेअर प्राध्यापक’पदी त्यांची नियुक्ती होऊ शकल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यमदूतांनाही मागे फिरवले

डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्टीफन यांच्याबद्दल लिहिले आहे. १९६१ मध्ये माझी आणि स्टीफनची भेट झाली तेव्हा तो ठणठणीत होता. फक्त बोलताना शब्द कधी कधी जिभेवरून घसरत असे. पण तेव्हा मला व माझ्या सहविद्यार्थ्यांना ती बोलण्याची एक ढब वाटायची. पण प्रत्यक्षात ती एका भयानक रोगाची पूर्वलक्षणे होती. अवयवांवर त्याचा ताबा कमी होत गेला तसा काठी, मग व्हीलचेअर वापरणे असे र्निबध आले. केवळ अथक जिद्द त्याच्यात असल्याने तो यमदूतांना मागे फिरविण्यात दोनच वष्रे नाही तर ४७ वष्रे यशस्वी ठरल्याची आठवण नारळीकर यांनी २०११ मध्ये त्यांच्या पुस्तकात नमूद केली आहे. स्टीफनला आणि मला एकाच वेळी अ‍ॅडम्स पुरस्कार जाहीर झाला. त्या वेळेस त्याने मला रात्री दहा वाजता फोन करून ही आनंदाची बातमी दिल्याची आठवणही नारळीकर यांनी पुस्तकात लिहिली आहे.

First Published on January 8, 2017 1:06 am

Web Title: stephen hawking
Next Stories
1 धर्माची जागा वस्तुसंग्रहालयातच!
2 सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला मुंबई विमानतळावर अटक, १ कोटींचे सोने जप्त
3 कुर्ल्याच्या कपाडियानगर झोपडपट्टीतील आग नियंत्रणात
Just Now!
X