धवल कुलकर्णी

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सध्याच्या आपात्कालीन परिस्थितीत करण्यासाठी मालवाहतूक करणारे ट्रक आणि टेम्पो यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून राज्याच्या परिवहन खात्याकडून त्यांना विशेष स्टिकर पुरवण्यात येतील. हे स्टिकर गाडीच्या दर्शनी भागावर लावल्यामुळे ही वाहन अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करतात हे पोलिस व संबंधित यंत्रणांच्या लक्षात येईल आणि या वाहतूकदारांना विनाअडथळा राज्यांमध्ये मालवाहतूक करता येईल.याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिकारी व मालवाहतूक ट्रक आणि टेम्पो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये निर्णय घेतला.

परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला सांगितले की अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्यांना वेगळे स्टिकर देण्यात येतील. हे स्टिकर वाहनांच्या दर्शनी भागावर चिकटवण्यात येतील आणि त्यांचा पुरवठा मालवाहतूक दारांना संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केला जाईल. हे स्टिकर लावल्यामुळे ही वाहने राज्यांमध्ये विना सायास प्रवास करू शकतील.

यासंदर्भात कुठलीही अडचण आल्यास परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे आजपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येईल आणि 24 तास चालणाऱ्या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 22614724 असेल. याच्यावर संबंधित वाहतूकदारांना संपर्क साधता येईल.

तसेच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहनांच्या चालकांना व क्लिनर व मान भरणाऱ्या व उतरणाऱ्या कामगारांना जर त्यांच्या घरापासून वाहना पर्यंत तसेच वाहतुकीचे इतर काम पूर्ण झाल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी जर एखाद्या जीप किंवा कार किंवा अशा वाहनांचा वापर वाहतूकदार करत असतील तर ही वाहतूक देखील अत्यावश्यक सेवा समजण्यात येईल आणि अशा वाहनांना सुद्धा स्टिकर पुरवण्यात येतील. वाहतूकदारांनी अशा चालकांना आणि कामगारांना ओळखपत्र पुरवाव्यात किंवा संघटनेच्या लेटरहेडवर अशा व्यक्तींची नावे नमूद करून सदर यादी वाहनात ठेवावी.