ई-बुकपेक्षाही वाचकांची सर्वाधिक पसंती;
‘टाटा लिटरेचर लाइव्ह – द मुंबई लिटफेस्ट’चे सर्वेक्षण

‘स्मार्ट’ भ्रमणध्वनी, संगणक, ई-बुक रीडरच्या आक्रमणातही बहुसंख्य वाचकांची पसंती ई-बुक वाचण्यापेक्षा छापील पुस्तक वाचण्यालाच असल्याचा निष्कर्ष टाटा लिटरेचर लाइव्ह – द मुंबई लिटफेस्टच्या एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लिटफेस्टच्या निमित्ताने हे सर्वेक्षण करण्यात आले. २ हजार ४१४ साहित्यप्रेमी आणि वाचक यात सहभागी झाले होते.
इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये भारत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुस्तकांची ऑनलाइन खरेदीही मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. मात्र असे असले तरी ई-बुक किंवा ऑनलाइन पुस्तक वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ते पुस्तक हातात घेऊन वाचण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. एकूण ८२.२८ टक्के लोकांनी ई-बुकऐवजी छापील पुस्तकालाच आपण प्राधान्य देत असल्याचे सांगितले. भारतीय आणि परदेशी लेखक यात ५५.२८ टक्के लोकांनी विदेशी लेखकांना पसंती दिली आहे, तर ४४.२८ टक्के लोक भारतीय लेखकांची पुस्तके वाचत आहेत. १ हजार २६ व्यक्तींपैकी भारतीय लेखकाला पसंती देणारे ७८ टक्के हे पुरुष वाचक आहेत.
साहित्यातील कोणत्या काल्पनिक पात्राला भेटायला जास्त आवडेल आणि सर्वात आवडते काल्पनिक चरित्र असे प्रश्नही विचारण्यात आले होते. यावर सर्वाधिक म्हणजे ३८.४६ टक्के वाचकांनी आपली पहिली पसंती शेरलॉक होम्सला दिली आहे, तर ५३.१४ टक्के महिलांनी शेरलॉक होम्सला भेटायला आवडेल, असे सांगितले आहे.
शेरलॉक होम्सखालोखाल ‘गॉन विथ द वाइंड’च्या ऱ्हेट बटलर (२१.९९ टक्के), ‘प्राइड अ‍ॅण्ड प्रिज्युडीस’च्या एलिझाबेथ बॅनेट (३०.९८ टक्के)

भारतातील वाचकांना ‘कादंबरी’ हा साहित्य प्रकार सर्वात जास्त आवडतो, असे चित्र समोर आले असून ६२.६५ टक्के लोकांनी आपल्याला कादंबरी वाचायला आवडत असल्याचे सांगितले आहे. अन्य साहित्य प्रकारात लघुकथा (२८.२६ टक्के), निबंध (४.७२ टक्के) यांचा समावेश आहे. कविता आणि नाटक या साहित्य प्रकाराला अनुक्रमे २.८४ व १. ५४ टक्के इतक्याच लोकांनी पसंती दिली आहे. ८१.०२ टक्के लोकांनी आपल्याला बिछाना किंवा कोच हे पुस्तक वाचण्याचे आवडते ठिकाण असल्याचे सांगितले आहे. पुस्तक वाचताना चहा किंवा कॉफी याला ४७.३४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. शेंगदाणे/काजू खात खात वाचणे (३१.३२ टक्के), गाणी ऐकणे (१५.६१ टक्के), तर ‘वाइन’चा ग्लास रिचवत पुस्तक वाचण्याला अवघ्या ५.७३ टक्के वाचकांनी पसंती दिली आहे.