आयपीएलचे निकाल आधीच ठरतात!

आयपीएलमधील क्रि केट सामन्यांवर सट्टेबाजांचे वर्चस्व असून सामन्यांचे निकाल निश्चित होत असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ माजली. तिघा खेळाडूंवर खापरही फुटले. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला, तरीही सट्टेबाजी आणि फिक्सिंगही सुरूच आहे. सट्टेबाजांनी सामन्याचा निकाल आधीच ठरविलेला असतो. नाणेफेक आणि सामना कोण जिंकणार, यावर सट्टेबाजच शिक्कामोर्तब करतात. आजच्या एका सामन्याचा निकाल एका सट्टेबाजामार्फतच सामन्याआधीच ‘लोकसत्ता’च्या हाती लागला. रविवारी पुणे आणि दिल्ली संघादरम्यान सामना झाला. एक सट्टेबाज आणि त्यांच्या व्यवहाराचा ‘लोकसत्ता’ने दिवसभर ‘पाठलाग’ केला आणि ही धक्कादायक माहिती समोर आली.

असा घडला घटनाक्रम 

सकाळी १०.००    – एका बुकीशी फोनवर संपर्क साधण्याची धडपड सुरू.. अनोळखी फोन स्वीकारले जात नसल्याचे स्पष्ट झाल्याने मध्यस्थाची शोधाशोध, मध्यस्थ मिळताच त्या मार्फत निरोप पोहोचविण्यात यश. मग एका ‘प्रायव्हेट नंबर’वरून त्याचाच फोन येतो. सामने फिक्स कसे होतात, ते कोण करतं यावर त्याचे पूर्ण मौन.. मग भेटण्यासाठी प्रयत्न सुरू.. ‘आज दोन सामने आहेत, बहोत कमाना है. आज नहीं मिल सकते, लेकिन साडेतीन बजे बात करेंगे. पूरा रिझल्ट बतायेंगे.’ पलीकडच्या एवढय़ा वाक्यानंतर प्रायव्हेट नंबरवरून आलेला तो कॉल कट होतो.

 दुपारी ३.४०  – पुन्हा त्याचा फोन येतो. ‘पुणे जिंकणार!’ ‘वैसाही सेटिंग हुआ है’.. तो खात्रीने सांगतो. आतापर्यंत ३० लाख मिळाले आणि पुढील सामन्यात ५० लाखांचे ‘टार्गेट’ आहे. त्याच्या आवाजात आनंद उसळत असतो..

 संध्याकाळी ४.००  – पुणे आणि दिल्ली संघादरम्यान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना पुणे संघाने ५ विकेट गमावत १७२ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या विकेट पडत गेल्या. ‘बेटफेअर’ या सट्टेबाजांच्या संकेतस्थळावर कधी दिल्ली तर कधी पुणे असे मागेपुढे होत होते. पुन्हा फोन येतो..  ‘आपको बताया ना, पूनाही जितने वाली है.. नो टेन्शन’, असे सांगून फोन बंद होतो.

 रात्री ७.३० वा  – दिल्लीचा संघ १३४ धावांवर गडगडला आणि पुणे संघाचा सट्टेबाजांनी ठरविल्याप्रमाणे ३८ धावांनी विजय झाला. ..सट्टेबाजांचे आयपीएलवर पूर्ण नियत्रंण असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले.