विघ्नहर्त्यांच्या विसर्जनासाठी समुद्रात उतरणाऱ्यापुढे जेली फिश पाठोपाठ आता स्टिंग रेचे विघ्न उभे ठाकले आहे. स्टिंग रे समुद्रकिनाऱ्यापासून दूर पळविणे अवघड असल्याने विसर्जनस्थळी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विसर्जनाच्या वेळी शक्यतो ठरावीक भाविकांनीच समुद्रात उतरावे, असे आवाहन पालिका आणि मत्स्य व्यवसाय (सागरी) विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणावर स्टिंग रे माशांचा वावर होता. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या सुमारे १२७ जणांना स्टिंग रेने दंश केला होता. यंदा किनाऱ्यांवर स्टिंग रे अथवा जेली फिशचा वावर आहे का, याबाबत मत्स्य व्यवसाय विभागामार्फत २५ ऑगस्टपासून पाहणी करण्यात येत होती. या पाहणीदरम्यान गिरगाव आणि जुहू किनाऱ्यालगत स्टिंग रेचा संचार आढळून आला आहे.शनिवारी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यावेळी गणेश विसर्जनासाठी खोल समुद्रामध्ये उतरू नये, तसेच नेमक्याच व्यक्तींनी समुद्रात उतरावे, असे आवाहन मत्स्य व्यवसाय (सागरी) विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक यांनी केले आहे.

मद्यपींना औषधांचा उपयोग होणार नाही..
गेल्या वर्षी किनाऱ्यावर स्टिंग रेमुळे (पाखट) झालेल्या जखमेवर औषधे लावल्यावर तसेच प्रतिजैविके दिल्यावर लगेचच आराम पडला होता. मात्र दारूचा अंमल असलेल्या रुग्णांवर प्रतिजैविकांचा परिणाम होत नव्हता. त्यामुळे या वेळी किनाऱ्यावर जाणाऱ्यांनी याबाबतही खबरदारी घ्यायला हवी, असा सल्ला पालिकेच्या प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिला. स्टिंग रे आणि जेली फिशमुळे निर्माण होऊ शकत असलेल्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत. या वेळी किनाऱ्यांवर प्रथमोपचार केंद्र, डॉक्टर, रुग्णवाहिका यांची सोय केली आहे.