करोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी मनुष्यबळात आर्थिक बाजार चालवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. करोनाचं संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केलं. सोमवारीच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन हे आवाहन केलं आहे. शेअर मार्केट, स्टॉक ब्रोकर्स आणि इतर वित्तीय संस्थांना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संचारबंदीचा निर्णय लागू केला. अत्यावश्यक सेवा म्हणजेच भाजीपाला, दूध, आरोग्य सेवा हे या संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच ज्या ठिकाणी कमीत कमी मनुष्यबळ वापरता येईल तेवढं वापरा असंही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. महाराष्ट्रात जिल्हांच्या सीमांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ९७ वरुन १०१ वर पोहचली आहे. कारण पुण्यात तीन आणि सातऱ्यात १ असे चार नवे रुग्ण सोमवार संध्याकाळ ते आजपर्यंतच्या कालावधीत आढळले आहेत. त्यामुळे राज्यातली परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठीच कर्फ्यू म्हणजेच संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळा, घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून आणि आरोग्यमंत्र्यांकडून पुन्हा पुन्हा करण्यात येतं आहे.