राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकारी यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासवून त्याची चढय़ा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा  इशारा सरकारने दिला आहे.

टाळेबंदीनंतर सुरूवातीच्या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाची समस्या निर्माण झाली होती.  मात्र सरकारने केलेल्या अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक, मजूर-कामगारांना प्रवासासाठी पास अशा उपाययोजनांमुळे या परिस्थितीत आता सुधारणा झाली आह, असा दावा सरकारने केला आहे.

भारतीय अन्न महामंडळ किंवा केंद्राच्या गोदामांमध्ये अन्नधान्याची कोणतीही कमतरता नाही. एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑईल कंपन्यांकडूनही त्यांचा नियमित पुरवठा होत आहे.  मात्र पुरवठा कामगारांचा तुटवडा असल्याने गॅस सिलिंडर ग्राहकांना घरपोच करण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र त्यात सुधारणा के ल्या जात आहेत.  दुधाचा कोठेही तुटवडा नाही. उलट दुधाच्या विक्री क्षमतेपेक्षा त्याची विक्री कमी होत असल्याचे दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्यांची आवक वाढली असून शेतकऱ्यांकडून थेट खरेदीही वाढली आहे. मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायटय़ांच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्री होत असून मोठय़ा इमारतींमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  पुढील काही दिवसांत ही व्यवस्था अजून वाढविण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

औषधांबाबत खबरदारी

औषधे, लहान मुलांचे खाद्य, इन्सुलिन आदींच्या पुरवठय़ाबाबत कोठेही मोठा तुटवडा नाही. औषध दुकानदारांना होणारा पुरवठा सातत्यपूर्ण कसा राहील त्याचबरोबर औषध निर्मिती क्षेत्रातील सर्व घटक आपल्या मालाची निर्मिती कशी सुरु ठेवतील याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू आणि औषधे उत्पादक कारखान्यांना टाळेबंदीमधून सूट देण्यात आली असल्याने हे कारखाने सुरू होण्यास अडचणी नसल्याचा दावाही सरकारने केला आहे.