गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यावरुन रविवारी दुपारी आग्रीपाडा येथे दोन गटानी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एका पोलीस हवालदारासह तीन जण जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला असून रात्री उशीरापर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती.
येथील आग्रीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते परिसरातील दुकानदारांकडे गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. एका दुकानदाराशी त्यांची वर्गणीवरून बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान नंतर दोन गटातील भांडणात झाले. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही बाजूच्या लोकांनी बीआयटी चाळीत दगडफेक केली.
घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलीस घटनास्थळी रवाना झाले. या दगडफेकीत सुनिल डोंगरे, चेतन लाड आणि सर्वेश साळवी हे तरुण तर आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नरेंद्र वाघ हे जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी अधिक कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या भागात शांतता असून पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांवर दंगलीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 3:35 am