मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पालिकेचा पोलखोल’ या सभेत गोंधळ घालत दगडफेक करणाऱ्या २० शिवसैनिकांना समता नगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली, मध्यरात्री या शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलीस अजूनही ६० ते ७० जणांच्या शोधात असून अटक शिवसैनिकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना-भाजप युती गेली २० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगत असून पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. नालेसफाईच्या घोटाळ्यापाठोपाठ रस्ते घोटाळाही उजेडात आला आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राम गुप्ता यांनी कांदिवलीच्या आकुर्ली मार्गावरील फोन्सेका कंपाऊंड येथे एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत मुंबई शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम ‘पालिकेचा पोलखोल’ करतील, अशी जोरदार प्रसिद्धी करण्यात आली होती. कांदिवली परिसरात या सभेची जोरदार प्रसिद्धी करत शिवसेनेने पालिकेत चालवलेल्या गैरकारभार जनतेसमोर आणण्यात येणार असल्याचा दावा मुंबई शहर काँग्रेसतर्फे करण्यात आला होता. रात्री पावणेआठच्या सुमारास निरुपम भाषण करण्यासाठी उभे राहिले असता, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह ७० ते ८० शिवसैनिकांनी घटनास्थळी निरुपम यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच, काहींनी दगडफेकीचा प्रयत्नही केला. सभेच्या दिशेने अंडी-टोमॅटोही भिरकाविण्यात आले.