विद्याविहार ते घाटकोपर दरम्यान घटना; मोटरमनच्या समयसूचकतेचे कौतुक

विद्याविहार-घाटकोपर दरम्यान रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या २६ वर्षीय तरुणीच्या मदतीसाठी एका मोटरमनने आपत्कालीन ब्रेकद्वारे लोकल थांबवून तिला वेळीच उपचार मिळवून दिले.

मध्य रेल्वेवरील विद्याविहार ते घाटकोपर स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. मोटरमनने गाडी थांबविताच या तरुणीसोबत असलेल्या सहकाऱ्याने प्रवाशांच्या मदतीने तिला डब्यात चढवले. पुढे घाटकोपर स्थानकात गाडी थांबल्यानंतर तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणीच्या मदतीसाठी लोकल थांबवलेल्या मोटरमनचे नाव सतीश टोंगले असून त्यांच्या समयसूचकतेचे कौतुक होत होत आहे. ही तरुणी सध्या बेशुद्धावस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

टोंगले सीएसएमटी ते अंबरनाथ धीम्या लोकलवर कार्यरत होते. दुपारी १.१६ वाजता लोकल सीएसएमटीतून निघाली. गाडी विद्याविहार ते घाटकोपर दरम्यान दुपारी १.५१ च्या सुमारास आली असता त्यांना दूरवर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावर एक तरुणी रुळावर पडलेली दिसली. तिच्यासोबत एक तरुणही होता. तो मदतीसाठी याचना करत होता. ते पाहताच  टोंगले यांनी लोकलचा आपत्कालीन ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली. गाडी थांबताच त्यांनी मागील डब्यात असलेल्या गार्डला सूचना दिली. लोकल थांबलेली पाहताच तरुणीसोबत असलेल्या तरुणाने तिला प्रवाशांच्या मदतीने एका डब्यात चढवले. ते दोघे गाडीत चढल्याची खात्री केल्यानंतर टोंगले यांनी गाडी पुढे नेली. तोपर्यंत गार्डने रेल्वे नियंत्रण कक्ष, स्टेशन मास्तर यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. घाटकोपर स्थानकात लोकल येताच जखमी तरुणीला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रूळावर पडलेली तरूणी गंभीर जखमी दिसत होती. तिचा सहकारी मदतीची याचना करत होता. तिला जवळपास मदत मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून त्वरित लोकल थांबवली, असे मोटरमन सतीश टोंगले यांनी सांगितले.

कुर्ला लोहमार्ग पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक एम.एम. इनामदार यांनी या माहितीला दुजोरा दिला. ही तरुणी लोकलमधून पडली होती. तिला सुरवातीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ती अजुनही बेशुद्धावस्थेत आहे. त्यामुळे तिला दुसऱ्या रूग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती इनामदार यांनी दिली.