मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरावर घोंघावणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावरील विमान फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तसेच विशेष रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला. मुंबई विमानतळावरील विमानांचे उड्डाण आणि आगमन सायंकाळी सहानंतर सुरू झाले. बेस्ट आणि एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवा देण्यात आली. मात्र तुलनेत कमी फेऱ्या चालविण्यात आल्या.

मुंबई विमानतळावर सध्या एकूण २५ उड्डाणे आणि २५ आगमन होत आहेत; परंतु बुधवारी वादळामुळे ११ विमानांचे उड्डाण आणि आठ विमानांच्या आगमनाला परवानगी होती. त्यानुसार प्रवासी आपल्या नियोजित वेळेप्रमाणे विमान पकडण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. परंतु वादळामुळे फेऱ्यांना बराच विलंब होत होता. त्यातच बंगळूरुवरून मुंबई विमानतळावर उतरलेले मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले आणि तांत्रिक समस्या उद्भवली. मात्र वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. सोसाटय़ाचा वारा, ही तांत्रिक समस्या यामुळे दुपारी २.३० ते सायंकाळी ७ पर्यंत विमान उड्डाणे व आगमन थांबवण्यात आले. वादळाचा जोर कमी होताच हवामान आणि धावपट्टीचा आढावा घेऊन सायंकाळी सहापासून विमान सेवा सुरू झाली. मात्र या गोंधळाचा प्रवाशांना मनस्ताप झाला.

मध्य रेल्वेनेही खबरदारी म्हणून एलटीटीतून सुटणाऱ्या पाच विशेष गाडय़ांच्या वेळेत बदल केले होते. सकाळी ११.१० वाजता सुटणारी एलटीटी ते गोरखपूर विशेष गाडी रात्री आठ वाजता, एलटीटीतून दुपारी सव्वाबारा वाजता सुटणारी दरभंगा गाडी रात्री ८.३० वाजता करण्यात आली होती.

प्रवाशांना बदललेल्या वेळांबाबतचा संदेश वेळेत न मिळाल्याने त्यांनी भर पावसात स्थानकापर्यंत धाव घेतली होती. मात्र गाडी उशिरा सुटणार असल्याचे समजताच प्रवाशांनी स्थानकातच थांबणे पसंत केले. मडगाव, कल्याण, नाशिकमार्गे येणाऱ्या थिरुवनंतपुरम ते एलटीटी गाडीला मडगाव, मिरज, पुणे, कल्याणमार्गे वळवण्यात आले. त्यामुळे प्रवास लांबला.

बेस्ट, एसटी कार्यरत

बेस्ट उपक्रमाने मात्र अत्यावश्यक सेवांसाठी बस चालवल्या. १,७२६ बस चालवण्याने डॉक्टर, परिचारिका, पालिका कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांची गैरसोय टळली. एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघरमधून बस सेवा चालवताना मात्र फेऱ्यांची संख्या कमी ठेवली.