दिवस रविवारचा.. वेळ मध्यरात्री १२.३० ची.. मोबाइल खणखणला आणि जखमांमुळे विव्हळणाऱ्या अंध श्वानाच्या मदतीसाठी मीतने ठाण्यातील उपवनच्या दिशेने धाव घेतली. प्राथमिक उपचारानंतर श्वानाला ठाण्याच्या एफपीसीए रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अतिरक्तस्रावामुळे दुसऱ्या दिवशी तो गतप्राण झाला.. ही एक घटना. पण आवड म्हणून प्राणीप्रेमी आपल्या घरी श्वान, मांजर, विविध पक्षी पाळतात. कालांतराने प्राणीप्रेम आटते आणि मग मुक्या प्राण्यांना बाहेरची वाट दाखवली जाते. अशा असंख्य प्राण्यांना आपल्या जिवाला मुकावे लागते.
उपवन परिसरात दोन-तीन दिवस बुलडॉग मॅस्टिफ जातीचा एक श्वान स्वैरपणे हिंडत होता. तीन-चार वाहनांनी धडक दिल्यामुळे तो जखमी झाला होता. किडय़ांनी भरलेल्या जखमांमुळे तो १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री प्रचंड विव्हळत होता. आसपासच्या नागरिकांनी मीत आशरशी संपर्क साधला. तात्काळ उपवनात धावलेल्या मीतने वेदनांनी विव्हळणाऱ्या श्वानाला पाहिले आणि तो अंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. मीतने त्याला चुचकारून शांत केले आणि जखमांमधील किडे साफ करून त्याला औषध दिले. त्यानंतर तो श्वान शांत झाला.
मीत आणि श्वानाच्या भोवती स्थानिकांची गर्दी वाढत होती. पण हा श्वान येथे कोठून आला, तो कुणाचा, त्याला येथे कुणी सोडले हे मात्र कुणालाच माहीत नव्हते. दृष्टिहीन झाल्यामुळे कुणीतरी त्याला येथे सोडून दिले असावे असा अंदाज मीतने बांधला आणि त्याला सोबत घेऊन मीतने ठाण्यातील एफपीसीए रुग्णालय गाठले. श्वानाला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले, पण दुसऱ्याच दिवशी श्वान मृत्युमुखी पडला आणि प्राणिमात्रांच्या सेवेसाठी तत्परतेने धावणाऱ्या मीतचे डोळे पाण्याने भरले.
अनेक प्राणीप्रेमी मोठय़ा आवडीने श्वान, मांजर आपल्या घरी पाळतात. मात्र कालांतराने त्यांना पाळीव प्राण्यांचा त्रास होऊ लागतो. श्वान-मांजर दृष्टिहीन, अपंग झाल्यानंतर तर त्यांना ते नकोसे होतात आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारी मंडळी त्यांना उकिरडय़ावर सोडून देतात. अशा वेळी या मुक्या प्राण्यांना खरी आधाराची गरज असते. ज्यांना पाळीव प्राणी नकोसे होतात त्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडू नये. आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मीतने केले आहे. मीतने आतापर्यंत आजारी, जखमी अवस्थेतील गाय, म्हैस, श्वान, मांजर, घोडा, हत्ती यांच्यासह अनेक पक्ष्यांची शुश्रूषा केली आहे.
 सीए इंटर्न आणि पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांत शिक्षण घेणारा मीत घरून मिळणारा पॉकेटमनी आणि इंटर्नशिपमधून मिळणारे पैसे मुक्या प्राण्यांच्या सेवेत खर्च करीत आहे.
 रस्त्यावर भटकणारी आणि सोडून दिलेल्या १२ मांजरी त्याने नौपाडय़ातील आपल्या घरी पाळल्या आहेत; तर आसपासच्या परिसरातील २२ श्वानांची तो काळजी घेत आहे.
संपर्क- ८७६७४३९४०९.