मुंबई : सनराईज रुग्णालयात उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने सुधीर लाड (६५) यांना शुक्रवारी दुपारी अन्य रुग्णालयात हलविण्याची तयारी नातेवाईक करत होते. परंतु त्याआधीच काळाने घात केला आणि त्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

भांडुपच्या कोकणनगरमध्ये राहणारे सुधीर यांना १० दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. मुलुंडच्या करोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना सनराईज रुग्णालयात दाखल केले होते. तिथेही त्यांच्यावर व्यवस्थित उपचार दिले जात नव्हते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात येणार होते. यासाठी कागदपत्राची सर्व प्रक्रिया करण्यासाठी आम्ही रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होतो. रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागल्याचे समजले. त्या वेळी आम्ही खालीच होतो. धूर लगेचच पसरल्याने वर जाण्याचे सर्व मार्ग बंद केले होते. त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण वरच अडकले. तरी त्यातूनही काही रुग्णांना वरच्या गच्चीतून बाहेर काढण्यात आले, तर काही रुग्णांना मागचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. सुधीरकाकांचा शोध लागत नव्हता. रुग्णांना बाहेर काढून अन्य रुग्णालयात पाठविण्यात येत होते. शेवटी मुलुंडच्या अगरवालमध्ये त्यांना आणल्याचे समजले. इथे आल्यावर त्यांचा मृतदेह दृष्टीस पडला. वेळ चुकली असती तर सुधीरकाका आमच्यात असते, असे त्यांचे नातेवाईक प्रभाकर मुळीक यांनी सांगितले. सुधीरकाकांना ऑक्सिजनवर ठेवले होते, परंतु ते ऑक्सिजन लावायचे नाहीत. म्हणून त्यांचे हातही बांधून ठेवल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.