मुंबई विभागातील सर्वोत्कृष्ट लोकांकिका ‘देव हरवला’ची रंजक जन्मकथा

मंदिराबाहेरून चप्पल चोरीला जाणे, ही किमान भारतात तरी एक सामान्य घटना समजली जाते. त्याची पोलीस ठाण्यात तक्रार करणे हा वेडेपणा समजला जातो. असाच ‘वेडेपणा’ सिद्धार्थ महाविद्यालयाच्या राहुल बेलापूरकर याने केला. यामुळे त्याची चप्पल मिळाली नाही, मात्र त्याला एकांकिकेचा विषय मात्र गवसला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीत अव्वल ठरलेली सिद्धार्थ महाविद्यालयाच्या (आनंदभवन) ‘देव हरवला’ या एकांकिकेच्या निर्मितीचा प्रवास असाच रंजक आहे.

एके दिवशी राहुल पंढरपूरला गेला असता त्याची चप्पल चोरीला गेली. याची तक्रार नोंदवायला म्हणून तो भाबडय़ा आशेने पोलीस ठाण्यात गेला. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याला जो अनुभव आला त्यातूनच ‘देव हरवला’ची संहिता उभी राहिली. राहुल आणि दिग्दर्शक विक्रम पाटील यांनी या संहितेवर तीन वर्षे काम के ले. संहिता अधिक वास्तववादी व्हावी म्हणून राहुल, विक्रम आणि संगीतकार निनाद म्हैसाळकर पंढरपूरच्या वारीत प्रत्यक्ष सहभागी झाले, तिथे राहिले. तेथील बारीकसारीक प्रसंगांवर त्यांनी चर्चा केली आणि त्याप्रमाणे संहितेत बदल केले. संहितेतील वातावरणनिर्मितीसाठी राहुलने स्वत: अभंग रचले. निनादने खास पंढरपूरहून एकतारा हे वाद्य मागवून त्यावर या अभंगांना चाली दिल्या. देवाशीष भरवडे याने पंढरपूर या ठिकाणाचा व्यवस्थित अभ्यास केला, तेथील छायाचित्रे पाहिली आणि नेपथ्य उभे केले. लोकांकिकाच्या महाअंतिम फेरीसाठी नेपथ्यामध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. या एकांकिकेसाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वप्निल आगवेकर यांनी प्रकाशयोजना केली आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्यात अनेकदा मतभेदही झाले.  या संहितेत अभिनय, नृत्य आणि गजर या तीनही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने तिन्ही गोष्टींसाठी त्यांची तयारी करून घेणे हे एक मोठे आव्हान होते. नृत्याची जबाबदारी नृत्य दिग्दर्शक राकेश शिर्के यांनी घेतली. दिवसभर फक्त नृत्य आणि गजर यांचीच तालीम होई. यापैकी बरेच जण अमराठी वातावरणातून आलेले असल्याने त्यांना पंढरीची वारी नेमकी काय असते हेच माहीत नव्हते. मग अनेक चित्रफितींच्या साहाय्याने त्यांनी वारी समजून घेतली, भाषा शिकून घेतली. ‘तुम्हाला हवी ती भूमिका निवडा आणि सादर करा असे स्वातंत्र्य विक्रमदादाने आम्हाला दिले होते. त्याबद्दल लिहून आणायला सांगितले. त्यातून आम्हाला आमची भूमिका सापडत गेली,’ असे हवालदाराची भूमिका करणारा सुमेध उन्हाळेकर सांगतो.

कोणत्याही संहितेवर लेखक, दिग्दर्शक अगदी सुरुवातीपासून काम करीत असतात. मग संगीतकाराने सर्वात शेवटी का यावे? मी जर सुरुवातीपासून काम करत असेन तर मलाही माझी मते मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे मी ‘देव हरवला’च्या टीमसोबत सुरुवातीपासून होतो. दु:खी प्रसंगाला दु:खी संगीत आणि आनंदी प्रसंगांना आनंदी संगीत यापलीकडेही संगीत आहे, जे मला करायचे आहे.

– निनाद म्हैसाळकर, संगीतकार

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.