संदीप आचार्य 
मुंबई: बरोबर पाच वर्षापूर्वी आजच्या दिवशी २२ वर्षाच्या सलीम खानवर ( नाव बदलून) हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. सलीमच्या बंद पडणाऱ्या हृदयाच्या जागी डॉक्टरांनी दुसरे हृदय बसविण्याची वैद्यक शास्त्रातील जटील शस्त्रक्रिया लीलया पार पाडली आणि सलीमच्या हृदयाची धडधड पुन्हा सुरु झाली. आज पाच वर्षांनंतर या आठवणीने त्याच्या हृदयाचे ठोके जोराने पडत होते… या ‘हृदयीचे त्या हृदयी’ ही कवी कल्पना प्रत्यक्षात आली होती.

सलीमची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्यापूर्वी असाच एक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा प्रयत्न ४७ वर्षांपूर्वी मुंबईतील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात झाला होता. दुर्दैवाने तो यशस्वी ठरला नाही. त्यानंतर तब्बल चार दशकांनी विख्यात हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात यशस्वी ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

संपूर्ण देशात डॉ. अन्वय मुळे यांच्या या शस्त्रक्रियेचे कौतुक झाले. ते एक आव्हान होते. सामान्यपणे कोणतीही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे एक आव्हानच असते. त्यातही हृदय प्रत्यारोपणाचे आव्हान हे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. डॉ. अन्वय मुळे यांनी व त्यांच्या टीमने हे आव्हान लीलया पेलले. बरोबर पाच वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्ट २०१५ रोजी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. तेव्हा २२ वर्षांचा असलेला सलीम आज २७ वर्षांचा झाला असून आता तो नियमित काम व व्यायाम करतो आहे. सामान्य आयुष्य जगत आहे.
या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा हा प्रवास चित्तथरारक होता. सलीमच हृदय जवळपास काम बंद करण्याच्या स्थितीत होत. कोणत्याही क्षणी हृदयाची धडधड बंद पडेल अशी परिस्थिती होती. हृदयप्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय त्याच्यासाठी शिल्लक होता. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ब्रेनडेड रुग्णाच हृदय मिळण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पुण्यातील जहांगीर रुग्णालयातील एका ब्रेनडेड रुग्णाचे हृदय मिळेल हे स्पष्ट झाले आणि डॉ. अन्वय मुळे व त्यांची टीम कामाला लागली. हृदय प्रत्यारोपणाच्या या शस्त्रक्रियेसाठी ‘काम, काळ आणि वेग’ याचे गणित अचूक गाठणेही तेवढेच आवश्यक असते. यासाठी खूप मोठी तयारी करण्याची गरज होती. दात्याचे हृदय काढल्यापासून ते हृदय वेळेत रुग्णालयापर्यंत आणणे एक आव्हान होते. पुणे पोलीस व मुंबई वाहतूक पोलिसांनी ही जबाबदारी स्वीकारली. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. पुण्याहून हे हृदय एअर अॅब्युलन्सद्वारे आणण्यात येणार होते. जहांगीर रुग्णालयात बरोबर दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी दात्याचे हृदय काढण्यात आल्यानंतर अवघ्या सात मिनिटात डॉक्टरांची टीम हृदय घेऊन पुण्याच्या विमानतळावर दाखल झाली. तेथून एअर अॅब्युलन्सद्वारे अर्ध्यातासात ते सांताक्रुझ विमानतळावर दाखल झाले. मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख मिलिंद भारंबे यांनी ग्रीन कॉरिडॉरची चोख व्यवस्था केली होती. विमानतळ ते रुग्णालय या रस्त्यावर एक मार्गिका यासाठी मोकळी करण्यात आली होती. वाटेतील सर्व सिग्नल हिरवे करण्यात आले होते. वाहतूक पोलिसांच्या मोटर बाईक व जीप रुग्णवाहिकेच्या पुढे धावत होती मार्गात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी. तब्बल १५० पोलीस ग्रीन कॉरिडॉरसाठी काम करत होते. अशाप्रकारची व्यवस्था एखाद्या शस्त्रक्रियेसाठी प्रथमच करण्यात आली होती.

विमानतळावर थेट धावपट्टीनजीक रुग्णवाहिका ह्रदय घेऊन येणार्या डॉक्टरांची वाट पाहात होती. विमानतळापासून ते रुग्णालयापर्यंत अवघ्या अठरा मिनिटात डॉक्टर पोहोचले आणि बरोबर चारच्या सुमारास डॉ. अन्वय मुळे यांनी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरु केली. जवळपास पाच तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. जसजसा वेळ होऊ लागला तसे उपस्थित सर्वांच्याच हृदयाचे ठोके न कळत वाढू लागले. अखेर शस्त्रक्रियागृहातून बाहेर आलेल्या डॉ. अन्वय यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले तेव्हा एकच जल्लोष झाला.

मुंबईतील या यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आजच्या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात डॉ. अन्वय मुळे यांनी तब्बल ११० यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि आणि चार हजाराहून अधिक बायपास शस्त्रक्रिया केल्या. साडेतीन वर्षाच्या अराध्यासह अठरा लहान मुलांच्या यशस्वी ह्रदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. अन्वय मुळे यांनी केल्या. यात एकाच दिवशी दोन हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश असून भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. साडेतीन वर्षाच्या अराध्याला दीड वर्षाच्या एका मुलाचे हृदय मिळाले होते. डॉ. अन्वय मुळे व त्यांची संपूर्ण टीम आज मुंबईतील हरकिसनदास अंबानी रुग्णालयात काम करत असून डॉ. मुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बायपास शस्त्रक्रिया करत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

बदलापूर येथे राहाणाऱ्या सलीमला आज काय वाटते असे विचारले तेव्हा डॉ. अन्वय मुळे यांनी मला नवे जीवन मिळवून दिल्याचे त्याने सांगितले. तो आज संगणक क्षेत्रात काम काम करत असून आजचा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही, असे तो म्हणाला. करोनाच्या काळात घरातूनच काम करत असलो तरी मी नियमित व्यायाम करतो असे त्याने आवर्जून सांगितले.