News Flash

तपासचक्र : पैसे गेले अन् भवितव्यही!

कांतिलाल जैन यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीसाठी मोठय़ा रकमेची गरज होती.

आपले कृत्य जगापासून-कायद्यापासून लपवून ठेवण्यासाठी गुन्हेगार हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो; पण गुन्हेगारी जगताच्या वाटांशी चांगल्याच परिचित असलेल्या पोलिसांना त्याचा सुगावा लागतोच. अलिबागमध्ये अशाच एका खून प्रकरणाचा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी उलगडा केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या..

अलिबाग शहरातील भाजप नेते आणि बांधकाम व्यावसायिक कांतिलाल जैन बेपत्ता झाल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. घरातून ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडलेले जैन घरीच न परतल्याने चिंतेचे वातावरण होते. जैन यांचा मोबाइलही नॉट रिचेबल होता. पोलिसांकडून जैन यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ते बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी रोहा शहराजवळील एका डोंगराजवळील एका जंगलात एक मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस पाटलांनी खबर दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणे जवळपास अशक्य होते. मात्र कपडय़ाचे तुकडे आणि शरीराचा काही भाग लक्षात घेऊन हा मृतदेह कांतिलाल जैन यांचाच असावा असा संशय पोलिसांना आला. रोहा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या मदतीला अलिबाग पोलीस स्टेशन आणि सायबर क्राइमची पथके देण्यात आली, तर पोलीस उपअधीक्षक अमोल झेंडे यांच्यावर तीन पथकांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली. आधी जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचे होते. त्यासाठी डीएनए तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. कांतिलाल जैन यांच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने मृतदेहाच्या डीएनएशी जुळवून पाहण्यात आले. यानंतर हा मृतदेह कांतिलाल जैन यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार कांतिलाल जैन यांचे अपहरण करून खून केल्याचे सिद्ध झाले. यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा संभाव्य मारेकऱ्यांच्या शोधाकडे वळवली. कांतिलाल जैन यांचे व्यावसायिक संबंध कोणाकोणाशी होते आणि या काळात ते कोणाच्या संपर्कात होते हे तपासण्यात आले.

जैन यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्समध्ये जगदीश जैन आणि कार्यालयात काम करणाऱ्या मनीषा चोरढेकर यांची नावे समोर आली. बेपत्ता होण्यापूर्वी कांतिलाल यांना जगदीशचा फोन आला होता आणि त्यांनी त्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितल्याचे पोलिसांना आढळून आले. या कॉल डिटेल्समुळे पोलिसांना तपासाची दिशा सापडली. जगदीश जैन यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला या घटनेशी काही संबंध नसल्याचा दावा जगदीश यांनी केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मनीषाच्या मदतीने व्यावसायिक कारणांसाठी कांतिलाल जैन यांचा खून केल्याची कबुली दिली.

कांतिलाल जैन यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीसाठी मोठय़ा रकमेची गरज होती. जगदीश यांनी आपल्या नातेवाईकांकडून ही रक्कम त्यांना मिळवून दिली होती. ठरावीक मुदतीत ही रक्कम परत करण्याचे आश्वासन कांतिलाल यांनी दिले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कांतिलाल जैन ही रक्कम देण्यास उशीर करत होते. यामुळे दोघांमध्ये वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे संतापलेल्या जगदीश यांनी कांतिलाल यांना अलिबागमधील ब्राह्मण आळी येथील चिरायू अपार्टमेंट येथे असलेल्या कार्यालयात संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान बोलावले. पैशावरून दोघांचे वाद झाले. रागाच्या भारात डोक्यात हातोडी मारून जगदीश यांनी कांतिलाल जैन यांचा खून केला. त्यानंतर कांतिलाल जैन यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय जगदीश यांनी घेतला. त्यांनी मनीषा चोरढेकर यांच्या मदतीने मृतदेह इमारतीतून बाहेर काढला. या हालचाली कोणालाही दिसू नयेत, यासाठी इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. नंतर कांतिलाल जैन यांचा मृतदेह जगदीश यांच्या गाडीत मागच्या सीटवर कापडामध्ये गुंडाळून ठेवण्यात आला.

गाडीत टाकलेला मृतदेह घेऊन आणि खून करण्यासाठी वापरलेला हातोडा घेऊन जगदीश आणि मनीषा मुरुडच्या दिशेने निघाले. हत्येसाठी वापरलेला हातोडा त्यांनी वाटेत एका खाडीत टाकला. मुरुडमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास जागा न सापडल्याने त्यांनी आपली गाडी रोह्याच्या दिशेने वळवली. रोह्याजवळील तांबडी गावाजवळ एका निर्जन स्थळी त्यांनी गाडी नेली आणि तेथेच कांतिलाल जैन यांचा मृतदेह जाळण्यात आला. मृतदेह ओळख पटता येण्यापलीकडे जळाल्यानंतर ते निर्धास्त होऊन आपल्या घरी परतले. मृतदेह ओळखता न आल्याने कांतिलाल यांच्या हत्येचा छडा लागणार नाही, असा या आरोपींचा कयास होता. मात्र, पोलिसांच्या चातुर्याने तो खोटा ठरवला.

सुरुवातीला या खून खटल्यात दोनच आरोपी असल्याचे पोलिसांना संशय होता. मात्र तपासादरम्यान यात आणखी एका व्यक्तीचा सहभाग समोर आला. जगदीशचे वडील पुखराज यांनी कांतिलाल जैन यांच्या दुचाकीची विल्हेवाट लावण्यात आरोपींना मदत केली होती. कांतिलाल जैन हे त्यांची दुचाकी घेऊन जगदीशच्या कार्यालयात आले होते. त्यामुळे त्यांचा खून झाल्यावर कांतिलाल यांच्या दुचाकीची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. यात पुखराज जैन यांनी मदत केली. कांतिलाल जैन यांची दुचाकी अलिबाग बायपास मार्गावर रस्त्याच्या कडेला निर्जन स्थळी नेऊन उभी केली.

या प्रकरणात पोलिसांनी तपासात दाखवलेली तत्परता आणि तपासकामी केलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उपयोगी ठरला. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सायबर क्राइम विभागाचे प्रमुख प्रमोद बडाख आणि अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे, साहाय्यक निरीक्षक डी. व्ही. कदम यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हेगारांचे सावज टिपण्यात पोलिसांना यश आले आणि तीनही गुन्हेगार जेरबंद झाले. सध्या माणगाव येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:03 am

Web Title: story of kantilal jain murder case
Next Stories
1 ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी रेल्वे स्थानकाची माहिती देणारे अ‍ॅप  
2 प्रकल्पांसाठी आदिवासींना विस्थापित करणे चुकीचे!
3 हिरव्या पाण्याखाली मगरी गुडूप!
Just Now!
X