News Flash

उत्तररात्री बेल वाजली आणि थरकाप उडाला..

घरातील चौघाही जणांच्या चेहऱ्यावर भीतीचे प्रश्नचिन्ह.

प्रतिनिधिक छायाचित्र

सहज सोपे झाले आहे हल्ली अमली पदार्थ मिळणे. अनेक शाळा-कॉलेजांजवळ खुलेआम विक्री होते त्यांची. मुलांच्याही हाती पैसा खेळत असतो. सहज बळी पडतात ती त्या व्यसनांना. हे केवळ एका विशिष्ट थरातच घडते असेही नाही. सगळ्याच सामाजिक, आर्थिक स्तरांना या अमली पदार्थाच्या नशेची कीड लागलेली आहे. आपल्या उंबरठय़ापर्यंत येऊन ती पोचली आहे. मुलांमधील या व्यसनाधीनतेचा सामना कसा करायचा? कसे सोडवायचे त्यांना त्या जीवघेण्या विळख्यातून?. या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक प्रयत्न. या कथा आहेत नशेच्या विळख्यात अडकून सुटलेल्या मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या.. आजपासून दर रविवारी प्रसिद्ध करीत आहोत ही विशेष मालिका.

(या वृत्तकथेतील सर्व नावे बदललेली आहेत.)

व्यसनभेद

मध्यरात्र उलटून गेली होती. सारे गाढ झोपलेले असतानाच दरवाजाची बेल वाजली, आणि सारेच खडबडून जागे झाले. घरातील चौघाही जणांच्या चेहऱ्यावर भीतीचे प्रश्नचिन्ह. कमलाकर जरा सावधपणेच दरवाजाजवळ गेला. धास्तावलेली सुमन दोन्ही मुलांचे हात धरून नवऱ्याच्या मागे उभी.. दरवाजा उघडला आणि चार पोलीस घरात शिरले, काही ऐकण्याच्या आधीच, आईच्या मागे लपलेल्या दिगंबरला त्यांनी घेरलेही. कमलाकर-सुमनच्या पायाखालची जमीन सरकली.. दिगंबरच्या गचांडीला धरून पोलिसांनी त्याला तिसऱ्या मजल्यावरून खेचतच खाली आणले. रस्त्यावर आधीच उभ्या असलेल्या जीपमध्ये टाकले आणि जीप कर्जतच्या दिशेने सुसाट सुटली.

..सकाळ झाली तेव्हा दिगंबरला समजले की हे काही तरी वेगळेच ठिकाण आहे. काही वेळाने सर्व काही त्याच्या लक्षात आले आणि तो कमालीचा अस्वस्थ झाला. परंतु तो आता काही करू शकत नव्हता, तो ‘बंदिवान’ होता!

कमलाकर आणि सुमन दोघेही सरकारी नोकरीत. चांगल्या पदांवरचे अधिकारी. ठाण्याच्या एका चांगल्या वसाहतीत राहाणारे हे मध्यमवर्गीय मराठी कुटुंब. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी पदव्युतर शिक्षण घेतेय. धाकटा दिगंबर. घरात त्याला दिगू म्हणतात. लहानपणापासून हुशार. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दिगूला दहावीला ८० टक्के गुण मिळाले आणि मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात त्याला विज्ञानशाखेत प्रवेश मिळाला. त्याने इंजिनीअर व्हावे, अशी आई-बाबांची इच्छा. दिगू दररोज महाविद्यालयात जाऊ लागला. परंतु पुढे त्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला. त्याचा रोजचा खर्च वाढला. महागडय़ा कपडय़ांची मागणी करू लागला. कमलाकरला शंका आली. त्याने महाविद्यालयात जाऊन चौकशी केली, तर तो वर्गात नव्हे तर वर्गाच्या बाहेरच जास्त रमत असल्याची माहिती मिळाली. इथे कमलाकरला चिंतेचा पहिला सौम्य धक्का बसला. कशीबशी अकरावी झाली. पुढे व्हायचे तेच घडले. दहावीला ८० टक्के गुण मिळविणारा दिगू कसाबसा ३६ टक्यांनी बारावी उत्तीर्ण झाला. आता मुलाच्या चिंतेने आईबापास ग्रासले होते..

मग दिगूला अभियांत्रिकी पदविका करण्यासाठी पुण्याला पाठविले आणि या कुटुंबाचे ग्रह फिरले. दिगू वाईट संगतीत गुरफटला. घरातून पैशाची जास्त मागणी करू लागला. घरात दोघे कमवणारे असल्याने मागणीनुसार पैशाचा पुरवठा सुरू झाला. रविवारी घरी आला तरी रात्री उशिरापर्यंत बाहेरच भटकायचा. आई हळवी होती, परंतु कमलाकर थोडा कडक शिस्तीचा होता. एकदा पुण्याला जाऊन त्याने परस्पर महाविद्यालयात चौकशी केली आणि दिगूबद्दलची माहिती ऐकून त्यांना धक्का बसला. दिगूचे शिक्षणात लक्षच नव्हते. पुढे काही महिन्यांतच त्याने पुण्यातून गाशा गुंडाळून घरची वाट धरली. त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. रात्री एक-दीड वाजेपर्यंत बाहेर राहायचा. घरातले खाणे कमी झाले. कमलाकर-सुमनचे काळीज चिंतेने कुरतडत होते. एकदा दोघांनी रात्री दिगूला गाढ झोप लागल्यानंतर, त्याची बॅग, पॅंट-शर्टाचे खिसे तपासले. बॅगेत रिकामी चिलिम सापडली. पँंटच्या खिशात सिगारेटचे पाकीट होते. सुमनला तर रडूच फुटले.

दुसऱ्या दिवशी दोघेही कामावर गेले नाहीत. दिगू अकरा वाजता उठला. चहा मागू लागला, आणि पहिल्यांदाच कमलाकरने दिगूच्या कानाखाली वाजविली. मात्र दिगूवर काहीही परिणाम झाला नाही. तो उठला आणि घराबाहेर पडला. सुमन हादरली. मुलगा काही बरेवाईट करून घेईल म्हणून ती घाबरली. शोधाशोध सुरू झाली. त्या दिवशी घरात कुणीच जेवले नाही. फोनाफोनी सुरू झाली. पण कुठेच त्याचा पत्ता लागेना. दोघांची चिंता वाढली. रात्री बारा वाजता दिगू तंद्रीतच घरी आला. आता पुन्हा बाप मारेल म्हणून आईने आधीच त्याला आपल्या पदराखाली घेतले..

दुसऱ्या दिवशी अकरा वाजता दिगू उठला. आईने नाष्टा-चहा दिला. तोपर्यंत शांत बसलेल्या कमलाकरने थेट विषय काढला. तू सिगरेट, गांजा ओढतोस, ड्रग्ज पण घेत असशील.. कमलाकरचा आवाज वाढला. दिगू निर्विकार होता. कमलाकर आणि सुमन हडबडून गेले. त्याची समजूत घालू लागले. परंतु सारे उलटेच घडत होते. सुरुवातीला चोरून व्यसन करणारा दिघू घरात आई-बाबाच्या समोर सिगरेट ओढू लागला. बापाकडून सिगरेटला पैसे मागू लागला. बाप पैसे देत नव्हता. पण जिवाला काही तरी करून घेईल, कुठे तरी निघून जाईल या भीतीने आई त्याला चोरून पैसे देऊ लागली. मग तो कुठे तरी बिगारी काम करू लागला. मिळालेले पैसे सिगरेट, ड्रगच्या व्यसनावर खर्च करू लागला. चुणचुणीत मुलगा रोगट दिसू लागला. जागरण, बाहेर भटकणे सुरू झाले. चिंतने पोखरून गेलेले आई-वडील त्याला डॉक्टरकडे, मानसोपचारतज्ञ्जाकडे नेत होते. समुपदेशन करीत होते. कमलाकर खचून गेला होता. आई तर पार कोलमडून गेली होती. मुलगा शिक्षण सोडून आलाय, तो कुठे जातो काय करतो, याची दबक्या आवाजात सोसायटीत चर्चा सुरू झाली. त्यामुळे आई-बापाला कुणाशी बालोवे असे वाटेना. घराची पार रया गेली. आला दिवस ढकलणे सुरू झाले.

एके दिवशी कर्जतजवळच्या सनराईज फाऊंडेशन नावाच्या संस्थेची माहिती मिळाली, आणि कमलाकर-सुमन गेले. त्यांनी मुलाची हकिकत सांगितली. संस्थाचालकांनी माहिती घेतली. किमान नऊ महिने त्याला केंद्रात ठेवावे लागणार होते. या कालावधीत त्याला कुणीही भेटायचे नाही, अशी अट होती. यांनी अटी  मान्य केल्या आणि पुढची तयारी सुरू केली.

त्या रात्री एक-दीडच्या सुमारास पोलिसांच्या वेशात कमलाकरच्या घरी आलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी बेल वाजवली. सारे काही माहीत असूनही कमलाकर व सुमनने आपणास काहीच माहीत नाही, असे नाटक केले. दिगूला उचलून थेट कर्जतला नेले. एका महिन्याने केंद्रातून फोन आला. दिगू इथे मिसळला होता. व्यसन अजून सुटलेले नव्हते, पण हा पहिला टप्पा होता. तीन महिन्यानंतर मात्र दोघांनाही रहावेना, त्यांनी संस्था चालकांना विनंती केली फक्त लांबून त्याला बघू द्या. परवानगी दिली. लांबूनच त्याला पाहिले, कमलाकर-सुमनला थोडा धीर आला. सहा महिन्यांनंतर दिगू सावरला. पूर्णपणे बदलला. त्याला घरी जायची ओढ लागली. संस्थेने परवानगी दिली.

.. दिगू घरी आला. तो आता पहिल्यासारखा बोलू लागला. मला शिकायचे आहे, असे म्हणू लागला. मग त्याच्या आवडीप्रमाणे त्याने पर्यटन व्यवस्थापनच्या पदविकेसाठी प्रवेश घेतला. रोज नियमित कॉलेजला जातो. आता सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय. कॉलेजतर्फे आता एका नामांकित पर्यटन कंपनीत तो इंटर्नशिप करतो आहे. गिटार वाजविण्याचा त्याला छंद आहे. त्याला गिटार घेऊन दिले. फावल्या वेळात तो गिटार वाजविण्यात रमून जातो. कमलाकर-सुमनला धीर आला. दिगू एका भयंकर संकटातून मुक्त झाला होता. एक कोलमडलेले घर पुन्हा हसते खेळते झाले होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:41 am

Web Title: story of overcoming heroin addiction
Next Stories
1 मूत्रपिंड विकार, हिवताप यामुळे ‘लक्ष्मी’ हत्तिणीचा मृत्यू
2 एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पूल फेब्रुवारीत
3 दहा मजल्यांच्या आराखडय़ावर आणखी चार मजल्यांना मान्यता
Just Now!
X