घरात नळ बसवायचा आहे मग एखादा प्लम्बर शोधण्यासाठी आपण अनेक दुकानांमध्ये फिरतो. छोटे काम असते म्हणून तो आपल्या घरी येण्यास टाळाटाळ करतो. शिवाय प्रत्येकाचे दर वेगळेच. इतकेच नव्हे तर आपल्याकडे येणारा प्लम्बर ओळखीचा नसतो, मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक अडचणी आपल्यासमोर असतात. अशीच परिस्थिती इलेक्ट्रिशियनपासून इतर छोटेखानी दुरुस्तीच्या कामांची असते. यावर तोडगा म्हणून मुंबईतील विनीत पांडे आणि विशाल पांचाळ यांनी http://www.raghukaka.com/  या संकेतस्थळाची निर्मिती केली. याद्वारे ग्राहक आणि विविध सेवा पुरवठादरांना त्यांनी एका व्यासपीठावर आणले. हे संकेतस्थळ या दोघांना एकमेकांशी संपर्क साधून देणे इतपतच मर्यादित नसून त्यांच्यातर्फे आलेल्या कामगाराने केलेल्या कामाची जबाबदारीही कंपनी घेणार आहे. यामुळे विनीतने तयार केलेले हे मॉडेल जरा हटके ठरत असून लोकांचा त्यांच्या सेवा पुरवठादारांवर विश्वास बसत आहे.

साधरणत: सात वर्षांपूर्वी कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये स्वच्छता सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने विनीत आणि विशालने एक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून विविध कॉर्पोरेट कार्यालयांना सुविधा पुरविली गेली. यानंतर नोकरीवर जाणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी घर स्वच्छता सेवा सुरू करण्याचा मानस संस्थापकांच्या मनात आला. यानंतर त्यांनी केवळ तीच सुविधा पुरविण्यापेक्षा इतर सुविधांची जोडही दिली. यात प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, सुतार आदी लोकांनाही सामान्यांना जोडण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याचे ठरविले. यातून या संकेतस्थळाचा जन्म झाला.  या संकेतस्थळावर विविध ५०हून अधिक सेवा पुरवठादार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईतील ही सेवा पुरविणाऱ्या विविध लोकांपर्यंत पोहोचून कंपनीने त्यांना या प्रणालीविषयी माहिती दिली. या प्रणालीमुळे त्यांचा व्यवसाय आणि उत्पन्न वाढण्यास कशी मदत होईल याची माहिती त्यांना पटल्यानंतर कंपनी त्यांची निवड करते. यानंतर कंपनीतर्फे त्यांना ग्राहकांच्या घरी जाताना कपडे कोणते घालयचे इथपासून ते त्यांना तुमचे काम समजावून कसे सांगायचे इथपर्यंतचे प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणानंतर त्यांच्या कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी एका तज्ज्ञ कामगारासोबत त्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेले जाते. त्यानंतर त्यांना वैयक्तिक काम दिले जाते. इतकेच नव्हे तर त्यांना कंपनीचे ओळखपत्रही दिले जाते. यामुळे त्यांच्याबद्दल सामान्यांना विश्वास वाटू लागतो. इतर कंपन्यांप्रमाणे केवळ ग्राहक आणि सेवा पुरवठादार यांच्यात सांगड घालून देऊन आम्ही आमची भूमिका संपवत नाही तर आमच्या मार्फत

काम केलेल्या सेवा पुरवठादाराच्या कामाची जबाबदारीही कंपनी घेते. यामुळेच कंपनीने केवळ संकेतस्थळ किंवा अ‍ॅपवर अवलंबून न राहता ठाण्यात विवियाना मॉलमध्ये दुकानही थाटल्याचे विनीतने स्पष्ट केले.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात कंपनीची सेवा महामुंबई परिसरातील विविध शहरांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असून मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या तीन क्रमांकाची सेवा पुरवठादार कंपनी म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस विनीतने बोलून दाखवला.

आव्हाने आणि उत्पन्न

हे संकेतस्थळ सुरू करताना पैसे हे मोठे आव्हान होतेच. मात्र त्याहीपेक्षा या क्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांपेक्षा वेगळे आणि अगदी बारकाईने विचार करून सेवा पुरविण्यावर आमचा भर होता. यामुळे सर्व माहिती गोळा करून सेवा पुरवठादारांपर्यंत पोहोचून वैयक्तिक सेवेचा लाभ घेणाऱ्यांशी जोडून देण्याचे मोठे आव्हान वाटत होते असे विनीत सांगतो. कंपनीने काही सेवा पुरवठादारांना थेट नोकरी दिली आहे तर काहींना ते बाहेरून सेवा पुरविण्यास सांगतात. यामध्ये कामानुसार होणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम कंपनी घेते हेच कंपनीचे मुख्य उप्चन्न स्र्रोत असल्याचे विनीत सांगतो.

नवउद्यमींना सल्ला

तुम्हाला लहानपणापासून एखादी समस्या सोडवण्याची आवड असेल तर तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकता, असा सल्ला विनीतने नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांना दिला. उद्योग सुरू करणे आणि तो चालविणे हा एक सुंदर प्रवास असतो, असेही विनीतने सांगितले.