शांताराम चाळ, गिरगाव

मुगभाट गल्लीत मधोमध उभी असलेली शांताराम चाळ म्हणजे १३५ वर्षांचा इतिहासच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील सावरकर, टिळक यांच्या सभांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणीबाणीच्या काळातील कारवायांचे केंद्र बनेपर्यंत या चाळीने मुंबईच्या सामाजिक जडणघडणीत आपला वाटा पुरेपूर उचलला आहे.

furnaces of gold and silver factories
मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
kolhapur ambabai temple marathi news, ambabai temple devotees kolhapur marathi news,
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत
navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात

कुणी एकेकाळी दक्षिण मुंबईमधील गिरगाव परिसरात टुमदार घरं, नारळी अन् पोफळीच्या बागा आणि वृक्षवल्लींनी नटलेला भाग होता. एका बाजूला अथांग सागर आणि दुसऱ्या बाजूला वृक्षवल्लींच्या सान्निध्यात उभी घरं असा इथला डामडौल होता. अनेक व्यापारी आणि प्रतिष्ठित मंडळींनी त्याकाळी चाळी उभारण्याचा सपाटा लावला होता. गावाकडून येणाऱ्या बिऱ्हाडांची सोय या चाळींमध्ये होत होती. गिरगावमधील अशीच एक चाळ म्हणजे शांताराम चाळ.

आताच्या मुगभाट गल्लीमध्ये अगदी मधोमध शांताराम चाळ उभी आहे. त्या काळी मलबार हिल येथील प्रतिष्ठितांपैकी एक असलेले भालचंद्र सुखथनकर यांनी साधारण १३५ वर्षांपूर्वी शांताराम चाळ बांधली. टप्प्याटप्प्याने चाळींची संख्या वाढत गेली. सॉलिसिटर शांताराम सुखथनकर हे भालचंद्र यांचे पुत्र. त्यांच्या नावाने या चाळी ओळखल्या जाऊ लागल्या. रस्त्याच्या कडेला एका रांगेत उभ्या असलेल्या या चाळीची रचना आजच्या स्वतंत्र सदनिकांसारखीच (फ्लॅट) म्हणावी लागेल. लाकडाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात आलेल्या चाळीत जाण्यासाठी चार प्रवेशद्वारे, प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर जिना, पहिल्या मजल्यावर आल्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला सहा-सहा खोल्या. सहा खोल्यांच्या घरात एक बिऱ्हाड. अशीच रचना दुसऱ्या मजल्यावरील घरांची. अन्य चाळींमध्ये दोन, तीन खोल्यांची घरं बांधण्यात आली. तर शांताराम चाळ बंगली ही टुमदार लाकडी देखणी इमारत आजही आपले मूळ अस्तित्व टिकवून आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे एका बिऱ्हाडात साधारण १५ ते १६ सदस्य. ब्राह्मण, दैवज्ञ आणि अन्य ज्ञाती-जातीमधील कुटुंबे या चाळींच्या आश्रयाला आली आणि शांताराम चाळ गजबजून गेली.

रस्त्यालगत असलेल्या शांताराम चाळीच्या पाठीमागे मोठ्ठे पटांगण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या पटांगणातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा प्रभृतींच्या सभा व्हायच्या. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्याच्या निर्धाराने हे मैदान दुमदुमायचे तसेच शांताराम चाळही भारून जायची. त्यामुळे ब्रिटिशांचे या चाळीवर विशेष लक्ष असायचे.

काळाच्या ओघात लोकसंख्या वाढत गेली आणि सुखथनकरांनी आणखी एक चाळ बांधली. ‘मालिनी ब्लॉक’ नावाने ही चाळ आजही गिरगावकरांमध्ये परिचित आहे. दिसायला चाळ असली तरी या इमारतीमध्ये सर्व सुविधायुक्त अशी घरं बांधण्यात आली. त्यामुळे आजही या इमारतीनं गिरगावकरांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आहे. मात्र ‘मालिनी ब्लॉक’ इमारत उभी राहिली आणि शांताराम चाळीतील ब्रिटिशांवर मुलुखमैदानी तोफ डागणाऱ्या नेतेमंडळींच्या सभांनी गाजणारं मैदान आक्रसलं गेलं.

शांताराम चाळीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे जेवताना सोबत ताटात लागणारं चमचमीत लोणचं येथूनच लोकप्रिय झालं. याच चाळीत वास्तव्याला असलेल्या बेडेकर कुटुंबाने चटकदार लोणच्याचा व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच बेडेकरांचं लोणचं लोकप्रिय ठरलं. इथलं लोणच्याचं दुकान काही कारणास्तव बेडेकरांना अन्यत्र हलवावं लागलं. मात्र १९१३ मध्ये बेडेकरांचं दुकान शांताराम चाळीमध्ये स्थिरावलं. पुढे काही कारणास्तव सुखथनकर कुटुंबीयांनी शांताराम चाळींमधील काही इमारती विक्रीस काढल्या. लोणच्याचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध झालेले वासुदेव बेडेकर यांनी १९७४ साली या चाळी विकत घेतल्या आणि या चाळींचे नामकरण बेडेकर सदन झाले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याच वेळी शांतारामाच्या चाळींमध्येही गणेशोत्सव सुरू करण्यात आला. पण १८९५ मध्ये मुंबईत प्लेगची मोठी साथ पसरली आणि अनेक कुटुंबांनी शांताराम चाळीतून आपला गाशा गुंडाळून गावाला पळ काढला. शांताराम चाळीत १८९३ मध्ये गणेशोत्सव सुरू केला याचा दस्तावेज या धावपळीत गायब झाला. त्यामुळे शांताराम चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात खंड पडला. प्लेगची साथ गेली आणि हळूहळू रहिवाशी परतले आणि १९०१ मध्ये पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा धुमधडाक्यात साजरा होऊ लागला, अशी कहाणी काही जुन्या रहिवाशांकडून आजही ऐकायला मिळते. आजही शांताराम चाळीतील गणेशोत्सव पूर्वीइतकाच धुमधडाक्यात साजरा होतो हे विशेष.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने भारलेले काही स्वयंसेवक या चाळींमध्ये वास्तव्याला होते. शांताराम चाळीच्या पटांगणात त्या काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी शाखा भरविण्यात येत होती. लाठी फिरविणे, कवायती, हुतूतू, लंगडी, आटय़ापाटय़ा आदी मैदानी खेळांनी संध्याकाळच्या वेळी मैदान गजबजून जायचे. देश स्वतंत्र झाला आणि १९४८च्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. या बंदीविरोधात ठिकठिकाणी सत्याग्रह सुरू झाले. स्वयंसेवकांची धरपकड झाली. गिरगावच्या ठाकूरद्वार नाक्यावरही महिला स्वयंसेविकांनी सत्याग्रह केला आणि पोलिसांनी धरपकड करून या महिलांना तुरुंगात डांबले. शांताराम चाळीतील एक महिला स्वयंसेविकेलाही तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणीच्या काळातही शांताराम चाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्र बनली होती. येथील तरुणांची धरपकड करण्यात आली. मात्र काळाच्या ओघात संघाची चाळीतील शाखा बंद करावी लागली. पण संघाने नेमून दिलेल्या कामाची धुरा येथील स्वयंसेवक गाजावाजा न करता आजही समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहत आहेत.

काही वर्षांपूर्वी याच भागातील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानने गिरगावमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा सुरू केली. या नववर्ष स्वागतयात्रेचे बीज बेडेकर सदनमध्ये रोवले गेले. केवळ दक्षिण मुंबईकरांच्याच नव्हे समस्त मुंबईकरांच्या मनात गिरगावातील नववर्षांच्या स्वागतयात्रेने मानाचे स्थान मिळवले आहे. बेडेकर कुटुंबाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे बेडेकर सदनमध्ये आयोजन केले जाते. या उपक्रमांमध्ये केवळ चाळकरीच नव्हे तर गिरगावातील अनेक आवर्जून उपस्थिती लावत असतात हे विशेष.

गेल्या काही वर्षांपासून चाळींतील जुन्या-नव्या पिढीतील संघाच्या स्वयंसेवकांनी शाखेचे पुनुरुज्जीवन केले. आता नित्यनियमाने सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत शाखा भरविली जाते. पूर्वीसारखी शाखेत स्वयंसेवकांची गर्दी नसली तरी संघ प्रार्थनेच्या सुरात बेडेकर सदन आणि शांताराम चाळीची सकाळ उजाडते. त्यामुळेच या चाळीला एक‘संघ’ परिवार म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही.

prasadraokar@gmail.com