लाखो माणसांचा वावर दर दिवशी असूनही अगदी स्वच्छ असलेली मुंबईतील जागा कोणती? काही वर्षांपूर्वी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी डोके खाजवावे लागले असते; पण आता कोणताही मुंबईकर या प्रश्नाचे उत्तर सहज देईल. मुंबई मेट्रोचे कोणतेही स्थानक, असे या प्रश्नाचे उत्तर आहे; पण हे उत्तर मिळण्यासाठी मेट्रोचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात..

मनुष्यस्वभाव मोठा विचित्र आहे. एका घटकेला अगदी शहाण्यासारखा वागणारा एखादा माणूस पाचच मिनिटांनंतर अचानक अंगात आल्यासारखा शिव्या का देऊ लागतो, दहा वेळा विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट न करणारी एखादी व्यक्ती एखादा महत्त्वाचा निर्णय एका फटक्यात कोणताही विचार न करता कशी काय घेते, ही न उलगडणारी कोडी आहेत. मुंबईकरांच्या स्वभावातही अशीच काही गोम आहे. म्हणजे घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरून बाजूच्या कोपऱ्यात पानाची पिचकारी टाकणारा मुंबईकर पूल चढून मेट्रो स्थानकात शिरला की, अचानक टापटीप वागू लागतो. भेळ खाऊन कागदाचा बोळा रेल्वे प्लॅटफॉर्मवर सहज टाकणारी व्यक्ती मेट्रो स्थानकात मात्र कचरापेटी शोधत असते. हे का, याचे उत्तर मिळणे कठीण आहे; पण एक गोष्ट मात्र खरी; दर दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त प्रवाशांचा भार उचलणारी मुंबईची पहिलीवहिली मेट्रो सुरू झाली तेव्हा होती, तेवढीच आजही चकचकीत आहे.

मेट्रो गाडी, स्थानके चकचकीत असण्यामागे जसा मनुष्यस्वभाव कारणीभूत आहे, तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त वाटा मेट्रोच्या सफाई कर्मचाऱ्यांचाही आहे. मुंबईत धूळ किती असते, हे मुंबईकरांना वेगळे सांगायची गरज नाही. तरीही दिवसाच्या कोणत्याही प्रहरी मेट्रो स्थानकावर गेलो की, धुळीचा लवलेशही दिसत नाही. एवढेच कशाला, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर चिखलाचा रबरबाट असताना मेट्रोची स्थानके, प्लॅटफॉर्म आणि अगदी गाडय़ासुद्धा पुसून लख्ख ठेवल्यासारख्या होत्या. यामागे लागणारे हात पाहू या..

मेट्रो गाडय़ांची सफाई चार टप्प्यांमध्ये होते. त्यात लाइट क्लििनग, डीप क्लििनग, स्टॉप एण्ड क्लििनग आणि ऑन द गो क्लििनग यांचा समावेश आहे. आता या प्रत्येकाचा अर्थ बघू या. लाइट क्लििनग हा प्रकार दर दिवशी मेट्रो डेपोमध्ये केला जातो. त्यात गाडीचे पायदान, आसने, हँडल्स, दरवाजे, खिडक्या यांची आतून-बाहेरून सफाई यांचा समावेश असतो. प्रत्येक सफाईच्या आधी आणि नंतर गाडीची छायाचित्रे घेतली जातात. ही सफाई ठरलेल्या मापकाच्या कमीत कमी ९५ टक्के एवढी व्यवस्थित होणे अपेक्षित असते. गाडी डेपोमध्ये आली की, सर्वप्रथम झाडूने झाडली जाते. त्यानंतर विविध भागांमध्ये सफाईसाठी वापरण्यात येणारे द्रव टाकले जाते. थोडा वेळ हे द्रव तसेच ठेवून त्यानंतर एका यंत्राद्वारे ते पुसले जाते. ही सफाई झाली की, गाडीचे पायदान पाण्याने स्वच्छ धुतले जाते. त्याची तपासणी एका निरीक्षकामार्फत होते.

डीप क्लििनग ही प्रक्रिया महिन्यातून दोन वेळा केली जाते. ती करताना मेट्रोचा डबा, डब्याखालील भाग, कानाकोपरा, आसनांखालील भाग, चौकटी आदी सर्वच गोष्टी हाय प्रेशर जेटने साफ केल्या जातात. हे मेट्रोचे सचल स्नान असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

स्टॉप-एण्ड क्लििनग या प्रकारात गाडी वर्सोव्याहून सुटून एकदा घाटकोपरला आली की, वरचेवर सफाई केली जाते. गाडीत कागद, वर्तमानपत्रे, प्लॅस्टिकच्या बाटल्या आदी कचरा पडला असेल, तर तो साफ केला जातो. त्याचबरोबरच बाहेरच्या बाजूने काचांवर किंवा डब्यावर काही घाण झाली असल्यास ती साफ केली जाते.

ऑन द गो क्लििनग या प्रकारात एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी सफाई कर्मचाऱ्यांची गरज लागल्यास ते एखाद्या स्थानकात येऊन डबा साफ करून जातात. उदाहरणार्थ एखाद्या प्रवाशाला अचानक उलटी झाली किंवा कोणाकडून जेवणाचा डबा सांडला, अशा परिस्थितीत मेट्रो कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यानंतर ऑन द गो क्लििनग कर्मचारी सफाई करून जातात.

स्थानकाची स्वच्छता

मुंबई मेट्रोवनची स्थानके देशभरातील सर्वात स्वच्छ स्थानके म्हणून ओळखली जातात. ही ओळख निर्माण करण्यासाठी दर दिवशी स्थानकातील १६ परिसरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या २७ प्रक्रिया राबवल्या जातात. त्याप्रमाणे स्थानकात उंदीर किंवा तत्सम कीटक येऊ नयेत यासाठी कीटकनाशक फवारणीही वेळोवेळी केली जाते. प्लॅटफॉर्म आणि त्या खालील सक्र्युलेटिंग भाग यांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेकडेही या दरम्यान लक्ष दिले जाते.

स्वच्छतेमागचा चेहरा

ही विविध स्तरांवरील स्वच्छता ठेवण्यासाठी मेट्रोचे कर्मचारी अविश्रांत काम करतात. मेट्रोच्या डेपोमध्ये गाडय़ांची स्वच्छता करण्यासाठी तीन अधीक्षकांच्या हाताखाली प्रत्येकी दहा अशी एकूण ३३ माणसे कार्यरत असतात. गाडी डेपोमध्ये आल्यापासून ती बाहेर पडेपर्यंत गाडीची स्वच्छता करणे, हे या कर्मचाऱ्यांचे काम असते. गाडीच्या प्रत्येक फेरीनंतर वर्सोवा आणि घाटकोपर येथे गाडी वरवर साफ करण्यासाठी या स्थानकांमध्ये दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. गाडी आली की, डब्यांमध्ये फिरून पडलेला कचरा उचलण्यापासून गरज भासल्यास काचा पुसण्यापर्यंतची कामे हे दोघे करतात.

मेट्रोची घाटकोपर ते वर्सोवा अशी ११ स्थानके साफ ठेवण्यासाठी प्रत्येक स्थानकावर २० असे २२० कर्मचारी तनात असतात. त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ४५ अधीक्षकांचीही नियुक्ती केली आहे. स्थानकाच्या १६ विविध भागांमध्ये होणाऱ्या २७ स्वच्छता कामांची जबाबदारी यांच्यावर असते. त्याशिवाय प्रसाधनगृहांसारख्या प्रवासी सुविधेसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोष्टींची साफसफाई करण्यासाठी ५० कर्मचारी दिवसभर ठरावीक वेळेत काम करत असतात. त्याचप्रमाणे या सर्व गोष्टी वेळच्या वेळी आणि मेट्रोने ठरवलेल्या मानकांप्रमाणे होत आहेत, हे पाहण्यासाठी स्थानक व्यवस्थापक आणि मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी दर दिवशी स्थानकाची पाहणी करतात. यात कोणतीही चूक किंवा कमी राहू नये, यासाठी सहा जणांचा एक गट कधीही अचानकपणे एखाद्या स्थानकाला भेट देऊन पडताळणी करतो.

समाजाला किंवा देशाला स्वच्छतेसारख्या प्राथमिक मूल्यासाठी मोहिमा राबवायला लागणे, त्या मोहिमेची धुरा त्या देशाच्या पंतप्रधानाने आपल्या खांद्यावर घेणे, त्यासाठी विविध स्तरांवरील लोकांना आवाहन करणे ही खरे तर लाजिरवाणी गोष्ट आहे. स्वच्छता ही सवय होण्याची गरज आहे. मेट्रोचे कर्मचारी रोजच्या अथक प्रयत्नांमधून ही सवय मुंबईकरांच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच कदाचित, अंधेरी किंवा घाटकोपर रेल्वे स्थानकातून मेट्रो स्थानकात शिरणारा मुंबईकर काही काळासाठी का होईना, या सवयीच्या अधीन होतो.

tohan.tillu@expressindia.com

@rohantillu