X

महाआघाडीवर एकमत

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतची ही पहिलीच बैठक होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत भाजप-शिवसेनाविरोधी लढय़ाची रणनीती

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनाला पराभूत करण्यासाठी समविचारी-धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी तयार करण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अन्य पक्षांबरोबर चर्चा करून दोन-तीन दिवसांत पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

काँग्रेसच्या वतीने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, आज मंगळवारी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, आमदार शरद रणपिसे, नसिम खान, विजय वडेट्टीवार, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतची ही पहिलीच बैठक होती. त्यात महाआघाडी करण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अन्य पक्षांबरोबर चर्चा करण्याचे ठरले. त्यानंतर पुन्हा बैठक होईल, त्यात महाआघाडीबाबत आणखी चर्चा होईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

* राष्ट्रवादीबरोबरच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची स्वंतत्र बैठक झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत प्रामुख्याने राज्यात भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळणे आणि त्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी तयार करणे यावर चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे त्यावर एकमत झाले.