03 August 2020

News Flash

खाऊखुशाल : हेल्थ ज्युस सेंटर- एक आरोग्यवर्धक प्रयोगशाळा

आपलं शरीर ही एक प्रयोगशाळा आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपण शरीरावर अनेक प्रयोग करत असतो.

आपलं शरीर ही एक प्रयोगशाळा आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपण शरीरावर अनेक प्रयोग करत असतो. कधी ते प्रयोग हितकारक ठरतात, तर कधी ते अपायकारक आणि मग आपण आजारी पडतो. आजारी पडल्यावर डॉक्टर फळं खा किंवा ज्यूस प्यायला सांगतात; परंतु आजारी पडल्यावरच का माणसानं हे करावं? अनेकांना तर नुसतेच ज्यूस आवडतही नाहीत. त्यामुळे एरव्हीसुद्धा जिथे वेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात अशा जागेच्या शोधात अनेक जण असतात. अशाच एका प्रयोगशील ठिकाणाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

मुंबईतील प्रसिद्ध किंग्ज सर्कल येथील महेश्वरी उद्यानाजवळच यशवंत डोंगरे हे फळविक्रीचा व्यवसाय करायचे. पुढे १९९६ साली त्यांचा मुलगा विलास डोंगरे याने याच जागी हेल्थ ज्यूस सेंटर सुरू केले. वीस वर्षांपूर्वी या ज्यूस सेंटरच्या बाहेर फक्त चार ते पाच खुच्र्या लागत आणि पन्नास प्रकारचे ज्यूस मिळत असत; पण आता येथे रात्री शंभराहून अधिक खुच्र्या लागतात आणि तब्बल बाराशे प्रकारचे ज्यूस मिळतात. विशेष म्हणजे कुठल्याही फळांचे ज्यूस एकमेकांत मिक्स करायचे आणि वेगळा प्रकार असं सांगत संख्या वाढवायची असं येथे चालत नाही, तर प्रत्येक ज्यूस तयार करण्याआधी त्या फळाचा मोसम, चव, रंग आणि आरोग्यदायी घटक यांचा विचार करूनच प्रयोग केले जातात. यासाठी विलास यांची एक विशेष टीम कार्यरत असून त्यामध्ये एका डॉक्टरांचादेखील समावेश आहे. त्याचप्रमाणे विलास यांचे वडीलच फळविक्रीच्या व्यवसायात असल्यामुळे ज्यूस सेंटरवर येणाऱ्या फळांचा दर्जाही सवरेत्कृष्टच असतो.

कुठल्याही वयाच्या व्यक्तीला स्ट्रॉबेरी हे फळ आवडतं. त्यामुळे हेल्थ ज्यूस सेंटरचं स्ट्रॉबेरी हे महत्त्वाचं फळ आहे. स्ट्रॉबेरीचे शंभरहून अधिक प्रकार येथे बाराही महिने मिळतात. येथे दोन मेन्यू तुम्हाला दिसतील. एका मेन्यूतील सर्व प्रकार वर्षभर, तर एक मेन्यू दर महिन्याला बदलतो, कारण आंबा, सीताफळ, लिची यांसारख्या फळांचे ज्यूस अनेकांना केवळ विशिष्ट मोसमातच प्यायला आवडतात. हेल्थ ज्यूस सेंटरमध्ये प्रयोगांना सुरुवात १९९९ साली झाली. विलास यांनी पहिल्यांदा अद्रक आणि िलबाचा मिल्कशेक तयार केला होता. तो प्रचंड हिट झाला. तेव्हापासून वेगवेगळ्या प्रयोगांना सुरुवात झाली जे आजतागायत सुरू आहेत. फळांसोबतच हल्ली भाज्यांचे ज्यूसही मिळायला लागले आहेत. त्याव्यतिरिक्त रोझ मिल्कशेक हा प्रकारही तसा आता जुना झालाय; पण येथे तुम्हाला मुंबईत कुठेही न मिळणारे रातराणी आणि मोगरा या फुलांचे मिल्कशेकही मिळतात. त्या फुलांचा सुवास आणि चव प्रत्येक सिप घेताना तुम्हाला वेड लावत असतो. मोसंबी, िलबू आणि खस यांचं मिश्रण असलेला बूम नावाचा ज्यूस येथे मिळतो. या ज्यूसला मस्त सुवास आहे; पण तो मी तुम्हाला येथे सांगणार नाहीए, कारण तीच त्याची गंमत आहे. साधारणपणे कालाखट्टा सरबत असतं, पण येथे कालाखट्टा ज्यूस मिळतो. हा कालाखट्टा पाण्यात तयार केला जात नाही, त्यामुळे हा ज्यूस थोडा जाडसर आणि चवीलाही वेगळा आहे. ते कॉम्बिनेशन काय आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच त्याची प्रत्यक्ष चव घेतलीत तर उत्तम. स्ट्रॉबेरी ब्लास्टर नावाचा मिल्कशेक तर तुफान आहे. हा मिल्कशेक चमच्याने खावा लागतो. यात जी पावडर टाकली जाते ती लिक्विडच्या संपर्कात आल्यावर फुटते. त्यामुळे ज्यूस खाण्यापिण्यासोबतच खऱ्या अर्थाने ब्लास्टर ठरतो. त्याशिवाय च्युइंगम, पानमसाला, दालचिनी, चिक्की, फणस, तुळशी, चंदन, व्हरीयली, खोबरं, ऑस्ट्रेलियन फळ प्रून यांचेही मिल्कशेक येथे आहेत. गवती चहाचा ज्यूसही इथलं खास आकर्षण आहे. आता तर चीझ मिल्कशेक बनवण्याचाही प्रयोग सुरू आहे.

दोन किंवा अधिक फळांचा ज्यूस एकत्रित करताना भरपूर संशोधन केलं जातं. येथे ज्यूसमध्ये विकतच्या नाही तर हेल्थ ज्यूस सेंटरच्या लॅबमध्ये तयार होणाऱ्या सिरपचाच वापर केला जातो. या सिरपमध्ये कुठलंच प्रिझव्‍‌र्हेटिव्ह टाकलं जात नाही. तसंच ज्या फळांचे ज्यूस ताजे देता येतात त्यामध्येही सिरप वापरण्यात येत नाही. ज्यूससाठी येथे लादीचा बर्फ न वापरता हॉटेलमध्ये मिळणाऱ्या आइस क्यूब वापरल्या जातात. त्यामुळेही ज्यूसची चव वेगळी लागते. सत्तर ते दीडशे रुपयांपर्यंत ज्यूसच्या किमती आहेत; परंतु वेगळ्या प्रयोगांसाठी ख्याती असलेल्या या ज्यूस सेंटरवर आल्यावर लोक किमतीकडे न पाहता वेगळ्या प्रकारांचा शोध घेत असतात. इथलं किचनही ओपन आहे. त्यामुळे तुमचा ज्यूस कसा बनवला जातोय, त्यात काय टाकलं जातंय हेदेखील तुम्हाला पाहायला मिळतं. तसंच प्रत्येक प्रकारच्या ज्यूससाठी वेगळ्या आकाराचे ग्लासेस येथे आहेत. साधारणपणे मिक्सरच्या जारचे ब्लेड अ‍ॅल्युमिनिअमचे असतात. त्यावर ब्लेड घासून त्याची पावडर तयार होते जी शरीराला अपायकारक असते. त्यामुळे येथे पितळेचा बेस असलेले विशेष जार तयार करून घेण्यात आले आहेत, जेणेकरून तुमच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. ज्यूसशिवाय येथे सँडविच आणि रोल्सही मिळतात. गुरुकृपाचा समोसा टाकून तयार केलेल्या सँडविचला विशेष मागणी असते.

हेल्थ ज्यूस सेंटर

कुठे- शॉप नं. ३/४, व्हीआयपी शोरूमच्या मागे, किंग्ज सर्कल, महेश्वरी उद्यानाच्या जवळ, माटुंगा (पूर्व), मुंबई-४०००१९.

कधी- सोमवार ते रविवार सकाळी १० ते रात्री १ वाजेपर्यंत.

प्रशांत ननावरे prashant.nanaware@indianexpress.com

Twitter – @nprashant

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2017 12:51 am

Web Title: strawberry milkshake health juice centre kings circle maheshwari udyan
Next Stories
1 निवडणुकीच्या ‘ड्राय डे’मध्ये थोडासा ओलावा!
2 महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय धोक्यात
3 न्यायालयाच्या आदेशांमुळेच ‘त्या’ विद्यार्थ्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण
Just Now!
X