News Flash

भटक्या कुत्र्यांच्या शोधात गृहसंकुलांमध्ये बिबटय़ांच्या फेऱ्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे आता पुन्हा मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवू लागले आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर रविवारी रात्री बिबटय़ा सावजाच्या शोधात बसला होता. भिंतीलगत असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी गोळा होणारी कुत्री या बिबटय़ांचे भक्ष्य ठरत आहेत. मात्र, त्यामुळे परिसरातील रहिवाशांत दहशत पसरली आहे.

संजय गांधी उद्यानाच्या संरक्षक भिंतीवरून गस्त; कचऱ्याच्या ठिकाणी येणाऱ्या कुत्र्यांवर डोळा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे आता पुन्हा मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवू लागले आहेत. बोरिवली परिसरातील काजूपाडा मशीद, ऋषिवन सोसायटी, सिद्धराज सोसायटी या गृहसंकुलांच्या परिसरालगत जमा होणाऱ्या कचऱ्याच्या ढिगात खाद्याच्या शोधात जमणाऱ्या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी रात्री बिबटे या ठिकाणी फेऱ्या मारताना दिसत आहेत. रविवारी रात्री १०च्या सुमारास ऋषिवन इमारतीसमोरील उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर एक बिबटय़ा आरामात पहुडलेला स्थानिकांनी पाहिला, स्थानिकांचा गोंधळ वाढल्यावर बिबटय़ाने जंगलात धूम ठोकली.
बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर गेल्या अनेक दिवसांपासून रात्री उशिरा बिबटय़ा दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक प्राणिमित्र संघटनांकडे करत होते. मात्र, पहाटेच्या सुमारास बिबटय़ा दिसत असल्याने व कोणावरही त्याने हल्ला न केल्याने याची फारशी चर्चा होत नव्हती; परंतु हा बिबटय़ा आता पहाटे नव्हे तर दोन-तीन दिवसांपासून रात्री १०च्या सुमारास दिसू लागल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. रविवारी रात्री एक बिबटय़ा ऋषिवन सोसायटीच्या बसस्टॉपजवळील संरक्षक भिंतीवर बसलेला आढळला. त्याचा फोटो काढण्यासाठी स्थानिकांची गर्दी झाल्याने बिबटय़ा जंगलात निघून गेला.
बिबटय़ाच्या फेऱ्या वाढण्यास या परिसरात वाढलेला कुत्र्यांचा उपद्रव जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीच्या विरुद्ध बाजूस काजूपाडा मशीद, ऋषिवन सोसायटी, सिद्धराज बंगल्यांची सोसायटी, ला-विस्टा, ला-बेलिझा इमारती आदी लोकवस्ती आहे.
या सोसायटय़ांसमोरील भिंतीखाली काही ठिकाणी कचराही पडलेला दिसतो. त्यामुळे येथे भटकी कुत्री गोळा होतात. हेच हेरून बिबटेही आता इकडे हजेरी लावू लागले आहेत. पोल्ट्रीतील कोंबडय़ांचा एक ट्रक येथे येत असून ट्रकमधील काही मेलेल्या कोंबडय़ाही येथे टाकल्या जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिक रहिवासी व प्रत्यक्षदर्शी संदीप म्हाप्रळकर म्हणाले की, पूर्वी बिबटय़ा रात्री उशिरा दिसत असल्याच्या तक्रारी सोसायटय़ांचे वॉचमन करत असत, मात्र आता रात्री दहाच्या सुमारासच बिबटय़ा दिसू लागला आहे. दरम्यान, यामुळे प्राणी व मनुष्य हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता असून वन विभागालाही याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे.

पालिकेने कचरा वेळोवेळी येथून उचलणे अपेक्षित असून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणासाठीही पालिकेने मोहीम राबवणेही अपेक्षित आहे. मात्र, पालिका यातले काही करताना दिसत नाही. तसेच, स्थानिकांनीही बिबटे वारंवार येतात हे लक्षात घेऊन कचरा न करणे व बिबटय़ा आल्यास गोंधळ न करणे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
– सुनीश कुंजू, ‘पॉझ’ संस्थेचे कार्यकर्ते

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 4:14 am

Web Title: stray dog chases away leopard from housing complex
Next Stories
1 मुक्तमार्गावरील दुचाकीस्वारांचे पोलिसांकडून समुपदेशन
2 मंडपांवरून मंडळ-व्यापाऱ्यांमध्ये जुंपली
3 उत्सवांतून भाजपचे शक्तिप्रदर्शन
Just Now!
X