संतोष प्रधान

विधान परिषदेचे पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजप किं वा परिवाराशी संबंधित संस्थांचा बालेकिल्ला हे वर्षांनुवर्षे रूढ झालेले चित्र अलीकडे बदलले आहे. शिवसेना, राष्ट्रवादीने या मतदारसंघांमध्ये हळूहळू आपली ताकद वाढविली. स्थानिक पातळीवर संघटना बळकट असल्यास त्याचा या मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी फायदा उठविला.

मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, नाशिक आदी पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार अगदी सहजपणे निवडून येत असे. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने आपली कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. तसेच शिक्षक मतदारसंघांमध्ये चांगली बांधणी केली होती. कालांतराने भाजपच्या वर्चस्वाला इतर राजकीय पक्षांनी धक्का दिला. मुंबई पदवीधर या मतदारसंघात भाजपचे आव्हान शिवसेनेच्या प्रमोद नवलकर यांनी मोडून काढले. भाजपचा पराभव करीत नवलकर यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण केली होती. नवलकर यांच्यानंतर दीपक सावंत व सध्या विलास पोतनीस या शिवसेनेच्या नेत्यांनी मतदारसंघ कायम राखला. मुंबई पदवीधर मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला.

कोकण पदवीधर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. वसंतराव पटवर्धन, अशोक मोडक, संजय केळकर आदींनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात २०१२ मध्ये राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांनी विजय संपादन केला होता. राष्ट्रवादीने कोकणातील आपली सारी ताकद पणाला लावून या मतदारसंघात विजय संपादन केला होता. २०१८ मध्ये निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते भाजपच्या वतीने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपने कायम राखला असला तरी निरंजन डावखरे यांच्यासारख्या अन्य पक्षातील नेत्याला पक्षाला आयात करावे लागले.  त्यात निरंजन डावखरे या राष्ट्रवादीच्या आमदाराला पक्षात प्रवेश देण्यात आला होता. अर्थात यातून भाजप आणि डावखरे या दोघांचाही फायदा झाला.

नाशिक पदवीधर मतदारसंघ कायम भाजपकडे असायचा. विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर प्रतापदादा सोनावणे हे निवडून आले होते. परंतु गेल्या दोन निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपची डाळ शिजू शकली नाही. काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे निवडून आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे असलेल्या तांबे यांनी मतदारसंघाची चांगली बांधणी केली होती. यातूनच भाजपने गेल्या वेळी आव्हान उभे करूनही तांबे यांना सहज विजय संपादन करता आला होता.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा वर्षांनुवर्षे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. प्रकाश जावडेकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. नंतर जनता दलाचे शरद पाटील यांनी भाजपचा पराभव केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखला. गेल्या वेळी मात्र राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे चंद्रकांत पाटील यांचा विजय शक्य झाला होता. चंद्रकांत पाटील हे २३०० मतांनी विजयी झाले होते, तर राष्ट्रवादीच्या बंडखोराने ३१ हजारांच्या आसपास मते घेतली होती. यंदाही भाजपपुढे राष्ट्रवादीचे आव्हान असेल.

नागपूर पदवीधर मतदारसंघ मात्र कायम भाजपकडे कायम राहिला. नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. भाजपसाठी हा मतदारसंघ सोपा मानला जातो. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपचे वर्चस्व मोडून काढले. भाजपला अनेक वर्षे या मतदारसंघात विजय मिळविता आलेला नाही. या वेळीही चव्हाण विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघ मात्र भाजपकडे कायम आहे. माजी राज्यमंत्री रणजित पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

पदवीधरप्रमाणेच शिक्षक मतदारसंघात संघपरिवारातील शिक्षक परिषदेचे वर्चस्व असायचे. पुढे भाजपचे वर्चस्व अन्य राजकीय पक्षांनी मोडून काढले. मुंबई शिक्षक हा मतदारसंघ संजीवनी रायकर यांच्यानंतर भाजपला कायम राखता आला नाही. लोकभारतीचे कपिल पाटील यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण केली.  मुंबई पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ भाजपला किंवा भाजपशी संबंधित संघटनांना गमवावे लागले. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपप्रणीत शिक्षक आघाडीतच बिनसले. गेल्या वेळी शेकापचे बाळाराम पाटील हे विजयी झाले. पुणे शिक्षकमध्ये भाजपचा पराभव झाला होता. अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे विजयी झाले होते.

मतदार नोंदणी महत्त्वाची

एकूणच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत आता पूर्वीप्रमाणे भाजपचे वर्चस्व राहिलेले नाही. शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर आपल्या ताकदीचा फायदा उठविला. मुंबई पदवीधर हा मतदारसंघ शिवसेनेचा आता बालेकिल्ला झाला. शिक्षक मतदारसंघांमध्येही भाजप किंवा संबंधित संघटनांना विरोध होऊ लागला. पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघांमध्ये प्रत्येक निवडणुकीत करावी लगाणारी मतदार नोंदणी हा महत्त्वाचा घटक असतो. जो पक्ष किंवा उमेदवार अधिक मतदार नोंदणी करतो त्याला विजय मिळविणे सोपे जाते. मतदार नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांची ताकद महत्त्वाची असते. घरोघरी जाऊन मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्यांचा संच उपयोगी पडतो. यामुळेच पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघात मतदारांची नोंदणी ही पहिली पायरी पार करणे आवश्यक असते. जास्त मतदार नोंदणी आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे हे दिव्य पार करू शकणाऱ्या उमेदवाराला विजय संपादन करता येतो.

निवडणूक महाविकास आघाडी संयुक्तपणे लढवणार -सतेज पाटील

कोल्हापूर : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार संयुक्तपणे लढवणार आहेत, अशी माहिती गृह राज्य, पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, की याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे. चर्चा होऊन इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राज्यातील जागांवर निर्णय होणार त्यानुसार कोणत्या जागा निवडल्या जाणार आहेत. हे त्यानंतरच जाहीर केले जाणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत होणार आहे. त्यानंतर आघाडीचे उमेदवार उभे केले जाणार आहेत.

चंद्रकांतदादांची वेळ चुकली

विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याचा विचार हा २०१९ सालच्या निवडणुकीलाच करायला हवा होता. जिल्ह्यात आठ आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. वेळ चुकली असल्याने त्यांची हिमालयात जाण्याची संधी निघून गेली आहे, असा टोमणा त्यांनी मारला.