बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि व्यसनाधिनता यामुळे प्रसुतीनंतर स्तनदा मातांमध्ये दूध येणे अडचणीचे ठरत असून नोकरदार महिलाची मोठी संख्या, कौटुंबिक ताणतणाव यामुळे मुंबईत या प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या मातांची संख्या वाढते आहे, असे निरीक्षण प्रसुति आणि स्त्री रोग तज्ज्ञ नोंदवित आहेत.

मुल जन्माला आल्यानंतर तातडीने त्याला आईच्या दुधाची आवश्यकता असते. मात्र मानसिक तणाव, व्यसनाधिनता, शारिरीक व्याधी अशा कारणांमुळे अनेक महिलांमध्ये दुधाचा अभाव आढळतो. यामध्ये नोकरदार महिलांचे प्रमाण अधिक आहे. कामाचा ताण, पोषक आहाराचा अभाव, धुम्रपान, मद्यपानाच्या सवयी यामुळे महिला शारिरीक आणि मानसिकदृष्टय़ा दुर्बल बनत आहेत. याबरोबरच सध्या महिलांमध्ये तंग कपडे घालण्याचे प्रमाण वाढले आहे. घट्ट कपडय़ांमुळे दूधाला अटकाव होतो. ‘घट्ट अंतर्वस्त्रांमुळे महिलांच्या स्तनाग्रांची वाढ पुरेशा प्रमाणात होत नाही आणि ती आत जातात.  दूध देताना आत गेलेली स्तनाग्रे वैद्यकीय पद्धतीने बाहेर काढली जातात,’ असे सायन रूग्णालयाच्या प्रसुति आणि स्त्री रोग तज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. यो.स.नंदनवार यांनी सांगितले. आईच्या दुधातून कॅल्शिअम आणि पोषक द्रव्ये मिळतात. परंतु, आईच्या दुधाची वानवा नवजात शिशुंच्या प्रतिकारकारक शक्तीवर परिणाम करणारी ठरते.

मूल जन्माला आल्यानंतर स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो आणि बाळ बाहेर आल्यानंतर स्त्रीची नाळ काढण्यापूर्वीच त्याला आईजवळ द्यावे. त्यामुळे आईला दुध (पान्हा फुटणे) येते आणि स्त्रीचे गर्भाशय आंकुचन पावते. परिणाम: स्त्रीच्या शरीरातून जाणारा रक्तस्त्रावही कमी होतो. मात्र अनेक रूग्णालयांमध्ये जन्मानंतर मुलाला आईपासून दूर ठेवले जाते, हे चुकीचे आहे. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला आईचे दूध द्यावे आणि त्यानंतर बाळाचा आहार वाढवावा, असेही डॉ.नंदनवार यांनी स्पष्ट केले. प्रसुतिनंतर महिलांनी तंग अंर्तवस्त्र घालू नये. अंर्तवस्त्रांबरोबर सध्या पॅडेड अंर्तवस्त्र घालण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रसुतिनंतर स्तनांची वाढ होण्यास अडथळा निर्माण होतो, असे बॉम्बे रूग्णालयाच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. निलिमा मंत्री यांनी सांगितले. व्यसनाधिनतेचा परिणाम स्तनदा मातांच्या दुधावर होतो. गेल्या काही वर्षांमध्ये सिझेरियन करणाऱ्या रिक्तस्त्राव झाल्यामुळे अ‍ॅनिमिया, रक्त आणि हिमोग्लोबिनची कमतरता, अशा समस्या निर्माण होतात, स्त्री रोग तज्ज्ञ  डॉ. शिल्पा अग्रवाल यांनी सांगितले.