बदलापूरमधील खराब रस्त्यांविरोधात शहरातील रिक्षा चालक मालक संघटना, शालेय बस आणि टॅक्सी संघटनांनी आज बंद पुकारला आहे.
बदलापूर शहरातील तब्बल ९० टक्के रस्ते खड्डेमय असल्याने नागरिकांनी प्रवासाच्या जाचाला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर खराब रस्त्यांमुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचेही आढळून आले आहे.
याविरोधात आज (सोमवार) वाहतूकीच्या रिक्षा, शालेय बससेवा इत्यादी महत्वाच्या दुव्यांनी बंद पुकारल्याने शहरातील प्रवासी वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. शालेय बससेवाही बंद असल्याने अनेक शाळाही आज बंद आहेत. तसेच रस्त्यावर एकही रिक्षा धावत नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक रिक्षाचालकांनाही शाररिक त्रास झाल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू केले नाही तर बेमुदत बंदचा इशारा सर्व वाहतूक संघटनांनी दिला आहे.