News Flash

नियम तोडणाऱ्यांविरुद्ध मुंबईत कडक कारवाई

दिवसभरात करोना रुग्णांची संख्या अकराशेवर; चार रुग्णांचा मृत्यू

करोनाचा वाढते रुग्ण पाहता मोठय़ा प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. गोवंडी येथे बुधवारी चाचण्या करण्यात आल्या. (छाया-अमित चक्रवर्ती)

मुंबईत बुधवारी तब्बल एक हजार १६७ जणांना करोनाची बाधा झाली तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा दरही ०.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ होत होती. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गेले दोन दिवस रुग्णसंख्या उतरणीला लागली होती. मात्र, बुधवारी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. आतापर्यंत मुंबईत तीन लाख २१ हजार ६९८ जणांना करोना झाला आहे. तर तीन लाख एक हजार ५७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर स्थिर आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी २९४ दिवसांवर घसरला आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गेल्या २४ तासांमध्ये सुमारे २१ हजार १२३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३१ लाख ८५ हजार ३३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जोखमीच्या गटातील सहा हजार ७३ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले.

नागपूर जिल्ह्य़ात दहा मृत्यू

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत १० करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर १,१८१ नवीन रुग्णांची भर पडली. यात शहरातील ७ मृत्यू आणि ९५५ बाधित असल्याने चिंता वाढली आहे. शहरात गेल्या पाच महिन्यात एका दिवसात आढळलेल्या बाधितांमध्ये हा उच्चांक आहे.

करोनाबाधित रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा

राज्यात करोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा असल्याचे अन्न व औषध विभागाने बुधवारी स्पष्ट केले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपलब्ध साठय़ाचा आढावा प्रशासनाने घेतला. राज्यातील करोना रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुमारे ५१ हजार तर फॅविपिरावीरचा सुमारे २० हजारांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय नागपूरमध्ये मायलन लॅबने तयार केलेल्या रेमडेसिवीरचा साधारण एक लाख इंजेक्शनचा साठा सध्याच्या घडीला असल्याचे प्रशासनाने सांगितले. काही तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:09 am

Web Title: strict action against violators in mumbai abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सागरी परिषदेत ४७ हजार कोटींच्या सामंजस्य करारांचे उद्दिष्ट
2 हमीऐवजी रोख रक्कम जमा करण्यास मुभा द्यावी -वरवरा राव
3 करोनाच्या उद्रेकावर मंत्रिमंडळात चिंता
Just Now!
X