ना वाद्यांच्या गजरातील मिरवणुका, ना प्रार्थनासभांसाठीची गर्दी, ना नियमांची पायमल्ली, ना निर्बंधांचे उल्लंघन.. करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत कोणतेही ताळतंत्र न सोडता यंदाचा नाताळ साजरा करण्यात आला. आप्तेष्टांच्या भेटीगाठी, चर्चमधील रात्रीच्या प्रार्थना यांवर निर्बंध आले असतानाही ख्रिश्चनधर्मियांनी शिस्तबद्धपणे नाताळचा आनंद घेतल्याचे ठिकठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये दरवर्षी नाताळचा जल्लोष अनुभवण्यासारखा असतो. मात्र, यंदा रात्रीच्या वेळेत संचारबंदी असल्याने रात्री बारापर्यंत चालणाऱ्या प्रार्थना यंदा दहा वाजताच आटोपल्या. स्थानिक चर्चमध्ये सामाजिक अंतर राखून लोकांना प्रार्थनेची परवानगी देण्यात आली होती, तर अनेक मोठय़ा चर्चनी ऑनलाइन माध्यमातून प्रार्थनेचे प्रसारण केले.

शीव, दादर, माहीम, वांद्रे, सांताक्रूझ आदी ठिकाणी दरवर्षी नाताळनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतो. परंतु यंदा या उत्साहाला जबाबदारीचे भानही आल्याचे दिसत होते. माहीम परिसरात सेंट मायकल आणि व्हिक्टोरिया अशी दोन महत्त्वाचे चर्च आहेत. जिथे दरवर्षी हजारो लोक एकत्र येऊन नाताळचा आनंद लुटतात. यंदा तिथेही शांततेला प्राधान्य देण्यात आले. ‘ऑनलाइन प्रार्थना करून चर्चने मोलाचे सहकार्य केले. लोकांनी घरात सण साजरा करण्याला प्राधान्य दिले,’ असे माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण सूर्यकांत कांबळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे माहीम चर्चमध्ये भव्य ‘ख्रिसमस क्रिब’ उभारला जातो. परंतु यंदा वर्तमानपत्रांपासून साधी सजावट करून सामाजिक संदेश देण्याचे काम या ‘क्रिब’द्वारे करण्यात आले आहे.

नाताळामध्ये  प्रार्थना झाल्यानंतर लोक एकत्र जमतात, भेटीगाठी घेतात, गाडय़ांमधून एकत्र फिरायला जातात. चर्च परिसर, चौपाटी अशा ठिकाणी गजबजाट असतो. यंदा मात्र लोक घराबाहेर पडताना दिसले नाहीत. पोलिसांनीही गर्दी होऊ नये यासाठी विशेष गस्त ठेवली होती. ‘वर्षांतून एकच सण आम्ही उत्साहात करतो. परंतु यंदा तोही अगदी साधेपणाने होत आहे. शिवाय मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांची भेट न झाल्याची उणीव भासते,’ अशी भावना धारावीतील किणी कुटुंबीयांनी व्यक्त केली.