जेएनपीटी बंदरातील गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया (जीटीआय) या खासगी बंदरातील कंटेनर हाताळणी करणाऱ्या कलमारचालकांचा (कंटेनरचालक) संप सुरू असल्याने जीटीआय ते करळदरम्यानच्या चार किलोमीटपर्यंत हजारो कंटेनरवाहक वाहनांची रांग लागलेली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुविधांशिवाय एकाच जागेवर तिष्ठत राहावे लागल्याने त्रस्त झालेल्या चालकांनी रविवारी दुपारी चारच्या दरम्यान अचानक आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची माहिती मिळताच तेथे आलेले न्हावा शेवा पोलीस व चालकांत झालेल्या झटापटीत चालकांना मारहाण झाल्याने हजारो संतप्त  चालकांनी पोलिसांवर दगडफेक करून त्यांची गाडी जाळली. त्यानंतर पोलीस कुमक आल्याचे समजताच पीयूबी परिसरातील पोलीस चौकी फोडून तिलाही आग लावण्यात आली.
नवी मुंबईचे गुन्हे विभाग पोलीस उपायुक्त सुरेश मेगडे व न्हावा शेवाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांच्या पथकाने कंटेनरचालकांची धरपकड सुरू केली. या वेळी  बोराटे यांच्या डाव्या हाताला दगड लागून ते जखमी झाले तर अन्य पोलीसही किरकोळ जखमी झाले.  
पोलिसांनी १० ते १५ चालकांना ताब्यात घेतले आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण असून घटनास्थळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनीही भेट दिली.