News Flash

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मागे; सरकारकडून सुरक्षेसह इतर मागण्या मान्य

डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने तसेच मागण्यांसदर्भात लेखी आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आल्याने हा संप मिटल्याचे मार्डकडून जाहीर करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.

जे जे रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुरक्षेच्या मुद्द्यावरुन गेल्या ४ दिवसांपासून जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप आज मागे घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मार्डच्या शिष्टमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने तसेच मागण्यांसदर्भात लेखी आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आल्याने हा संप मिटल्याचे मार्डकडून जाहीर करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, संप मिटल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जे. जे. रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी दोन निवासी डॉक्टर आणि परिचारिकांना शनिवारी सकाळी मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून संप पुकारला होता आज याचा चौथा दिवस होता. दरम्यान, रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असून याबाबत ठोस कृती कार्यक्रम राज्य सरकारने दिल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने घेतली होती.

डॉक्टरांना मारहाणप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी रुग्णाच्या चार नातेवाईकांना अटक करण्यात आली. पोटाच्या विकारावर उपचारांसाठी जे जे रुग्णालयात दाखल झालेल्या ४५ वर्षीय झायदा बिबी या महिलेचा शनिवारी सकाळी शस्त्रक्रिया विभागात मृत्यू झाला होता. तिच्या नातेवाईकांना याबाबत कल्पना देत असताना संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सकाळी सातच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमध्ये एक महिला व पुरुष डॉक्टरसह परिचारिकेलादेखील रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली.

या घटेनेचे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध असून यामध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याबरोबरच नातेवाईकांनी रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केल्याचे दिसून येते. सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना हल्ला करणे आणि त्यांना कर्तव्यापासून रोखणे आदी गुन्हे दाखल करत जे जे मार्ग येथील पोलिसांनी रुग्णाचे नातेवाईक मोहम्मद अल्ताफ शेख (३२), सोनी सानाउल्लाह शाह (२३), रिहान सानाउल्लाह शाह(२२), समिला सानाउल्लाह शाह (२०) यांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 5:49 pm

Web Title: strike end of j j hospital doctors
Next Stories
1 मन प्रसन्न करणारी मुंबईजवळची पाच निसर्गरम्य पर्यटनस्थळं
2 अनैतिक संबंधातून हत्या, मराठी चित्रपट निर्मात्याला अटक
3 बेइमानी म्हणजे काय हो साहेब? – उद्धव ठाकरे
Just Now!
X