संदीप आचार्य

आम्हाला करोना विषाणू संसर्ग झाला तर आमच्या लहान मुलांची काळजी कोण घेणार? आम्हाला संसर्गापासून बचाव करण्यासाठी पोशाख मिळणार की नाही, असे संतप्त सवाल करीत जोगेश्वरी येथील महापालिकेच्या ‘बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल’मधील परिचारिकांनी घोषणा देत हॉस्पिटल दणाणून सोडले.

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर करोनाबाधितांसाठी १०० विलगीकरण खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३ मजली रुग्णालयात आणखी १०० खाटांची करोनाबाधितांसाठी तयारी केली जात असून सध्या करोनाबाधित रुग्णांची व्यवस्था पाहण्यासाठी ८० परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या येथे करोनाचे ३० रुग्ण तर विलगीकरण कक्षात ७४ जण दाखल आहेत. याशिवाय ज्यांची चाचणी नकारात्मक आली आहे असेही रुग्ण असून यातील नऊ रुग्ण दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीत बाधित आढळले, असे येथील परिचारिकांचे म्हणणे आहे. आज आम्ही कोणत्या परिस्थितीत काम करतो याची बाहेर कोणाला कल्पना नाही. ८० परिचारिका असताना आम्हाला केवळ पाच करोना संरक्षित पोशाख पाठविण्यात आल्याचे या परिचारिकांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दिवसरात्र काम करणाऱ्या या परिचारिकांच्या जेवणाखाण्याचीही योग्य काळजी पालिका प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही. या ८० परिचारिकांना पालिकेने वेळेत जेवण न दिल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली.

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील परिचारिकांना लगेचच पुरेसे पोशाख पाठवले जातील. त्यांना वेळेवरच नाश्ता-जेवण मिळाले पाहिजे. मी स्वत: त्याची खात्री करून घेईन. आमचे डॉक्टर, परिचारिका आणि करोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाची योग्य काळजी घेतली जाईल. आज जेवण का उशिरा गेले याचीही चौकशी केली जाईल आणि पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची मी हमी देतो.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त महापालिका