जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता व नेत्ररोगचिकित्सा विभागप्रमुख यांना पदावरून हटवण्यासाठी गेल्या रविवारपासून आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेची भूमिका आता मवाळ झाली आहे. विधानसभेत घोषणा झाल्याप्रमाणे निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोन्ही डॉक्टरांना रजेवर पाठवण्याची मागणी मार्डने केली आहे. शुक्रवारपासून मार्डने राज्यभरात सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. गुढीपाडव्याच्या रजेमुळे रुग्णालयाच्या कामकाजावर पहिल्या दिवशी फारसा परिणाम झाला नाही.
जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोगचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी रविवारपासून जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले. गुरुवारी राज्य सरकारने मेस्मा लागू केल्यानंतरही शुक्रवारपासून हे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू झाले. राज्य सरकारची १४ रुग्णालये व मुंबई पालिकेच्या तीन रुग्णालयांत आपत्कालीन विभागात निवासी डॉक्टरांनी सेवा दिली. गुढीपाडव्याच्या रजेमुळे बाह्य़ रुग्ण कक्ष बंद असल्याने पहिल्या दिवशी रुग्णालयांचे कामकाज सुरू राहिले.