वाहतुकीदरम्यान क्षुल्लक कारणांवरून हाणामारीच्या घटना

दिशा खातू, मुंबई</strong>

वाहनांची वाढती वर्दळ, त्या तुलनेत रस्ते अपुरे असल्याने होणारी वाहतूक कोंडी, वाहनतळांची अपुरी संख्या अशा विविध कारणांमुळे वाहनचालकांवरील मानसिक ताण वाढत चालला असून त्याचे दृश्य परिणाम गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दिसू लागले आहेत. किरकोळ कारणांमुळे चालकांमध्ये वादावादी आणि प्रसंगी हाणामारी होण्याच्या घटना वाढत असून गेल्या काही महिन्यांत अशा वादांमध्ये तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.

सरकारी यंत्रणा आणि नियोजन प्राधिकरणे महानगरांतील रस्ते, उड्डाणपूल यांसह अन्य सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गाच्या उभारणीचे प्रकल्प आखत असले तरी, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब होऊन बसली आहे. आधीच धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांतील मानसिक अस्वास्थ्य वाढत आहे. त्यात वाहतूक कोंडीतच जास्त वेळ खर्च होऊ लागल्याने चालक आणि प्रवाशांची चिडचिड होणे, अस्वस्थता वाढणे स्वाभाविक आहे. मात्र आता हा ताण त्यांना हिंसकही बनवू लागला आहे. गेल्या आठवडय़ात दक्षिण मुंबईत एका टॉवरमध्ये दुचाकी लावण्यावरून एका २४ वर्षांच्या सुरक्षारक्षकाने २८ वर्षांच्या व्यक्तीला जबर मारहाण केली. त्याआधी वाहनतळातील वादातून एक महिला आणि तिच्या मित्राशी गैरवर्तन केल्याबद्दल आंबोली पोलिसांनी दोघा व्यावसायिकांना अटक केली होती. हे दोन्ही वाद मारहाणीपर्यंत पोहोचले होते. मात्र गेल्या १० महिन्यांत अशा वादांतून तीन जणांना जीव गमवावा लागला. वाहतूक पोलिसांनी हटकले म्हणून त्यांच्यावरही हल्ले होत आहेत.

‘रस्त्यावरील हाणामारी अर्थात ‘रोड रेज’ हे सामाजिक स्वास्थ्य ढळल्याचे लक्षण आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे कामाचा ताण वाढला आहे. त्यात अपुरे, निकृष्ट रस्ते, वाहतूक कोंडी याला रोज तोंड द्यावे लागते. त्यामुळे ताणात भर पडते आणि क्षुल्लक वादाचेही पर्यवसान मारामारीत होते. या वर्तनाचा अनेकांना पश्चात्तापही होतो. त्यामुळे वाहन चालवताना नियम पाळणे आणि मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे,’ असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी व्यक्त केले.

‘रोड रेज’च्या घटना

* फेब्रुवारी, २०१८- गोवंडी येथे ओला चालक सलीम शेख यांचा तीन दुचाकीस्वारांच्या मारहाणीत मृत्यू.

* सप्टेंबर, २०१८- दुचाकीस्वारांनी केलेल्या मारहाणीत कुर्ला येथील संपत सोनावणे या पादचाऱ्याचा मृत्यू.

* भायखळा येथे रुग्णवाहिकेजवळ दुचाकी लावणाऱ्या तरुणाला डॉ. मुन्नावर अहमद यांनी हटकले. त्या तरुणाने केलेल्या मारहाणीत डॉ. अहमद जखमी.

* धारावी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना हटकल्याने विनोद देवेंद्र (२९) याची हत्या.

* नोव्हेंबर, २०१८- कल्याण येथे दुचाकीने धडक दिल्याने १७ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला

* अंधेरी-कुर्ला रोड येथे राहुल गावकरच्या (२८) वाहनाचा इतर वाहनाला धक्का लागल्याने राहुलला बेदम मारहाण करून गाडी जाळली.

तक्रारींत वाढ

मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत रोज वाहनचालकांच्या वादाच्या किमान पाच तक्रारी येतात. हा आकडा वाढत आहे. ९० टक्के तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत येतच नाहीत. एखाद्याला गंभीर दुखापत झाली वा वाहनांचे नुकसान झाले तरच तक्रारी नोंदविल्या जातात, असे पोलिसांचे म्हणणे आहे

अनेकदा वाहतूक पोलिसांशी वाद घातला जातो, त्यांच्यावर हल्ला होतो. आम्ही पोलिसांनाही संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहनचालकांनीदेखील संयम बाळगायला हवा. ताबा सुटल्यास कोणालाही दुखापत होऊ  शकते.

अमितेश कुमार, वाहतूक पोलीस उपायुक्त