07 August 2020

News Flash

मुंबई, ठाण्यात दमदार

सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार, आजही अतिवृष्टीचा अंदाज

ठाणे

मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली.

मुंबईत शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली. शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते.

टाळेबंदीच्या निर्बंधांमुळे रस्त्यावर गर्दी कमी होती. त्यामुळे मुंबईकरांना पावसाचा थेट फटका बसला नाही वा नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीचे प्रकार फारसे घडले नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मात्र सलग दुसऱ्या दिवशी तारांबळ उडाली. बेस्ट आणि रेल्वेची वाहतूक सुरळीत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पडझड, नुकसान

संततधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात चार ठिकाणी घर, घराच्या भिंतीचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरात नऊ ठिकाणी आणि उपनगरात २३ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. बेस्टच्या कन्नमवार येथील विश्रांतीगृहात पाणी शिरले होते.  ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसर, समता नगर, मल्हार सिनेमागृह, गोखले रोड, बाळकूम अग्निशमन केंद्र आणि बारा बंगला, कोपरी या ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मल्हार सिनेमागृहाच्या परिसरात चारचाकी गाडीवर झाड कोसळल्याने गाडीचे नुकसान झाले. कोपरी परिसरातील गांधीनगर येथे एका घराच्या छतावर झाडाची फांदी कोसळल्याने छताचे नुकसान झाले. वागळे इस्टेट भागातील हजुरी परिसरात एका घराची भिंत कोसळली. दुर्घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले.

येथे पाणी तुंबले

मुंबईत मुसळधार पावसामुळे हिंदमाता, धारावी क्रॉस रोड, पंचायत रोड वडाळा, काळाचौकी, एसआयईएस कॉलेज, भायखळा पोलीस ठाणे, चेंबूर, अंधेरी सबवे आणि वांद्रे येथील नॅशनल कॉलेज या ठिकाणी पाणी साचले. संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू होते. पाणी तुंबल्यामुळे शीव रोड, हिंदमाता, शिवडी, गांधी मार्केट आणि वांद्रे येथील बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले. ठाणे शहरात वंदना सिनेमागृह, आंबेडकर मार्गाजवळील दादर आळी, नौपाडय़ातील चिखलवाडी, शेठवाडी, श्रीरंग, वृंदावन, कळव्यातील बुधाजीनगर, जवाहरनगर, दिव्यातील सिद्धिविनायक गेट, बीआर नगर, ओंकार नगर आणि जांभळी नाका या सखल भागांत पाणी साचले होते.

कल्याण-डोंबिवलीतही जोर

कल्याण डोंबिवली शहरातही शनिवारी पावसाचा जोर होता. रेल्वे स्थानक परिसर आणि एमआयडीसी परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक बैठय़ा घरांमध्ये पाणी शिरले. अनेक भागांमध्ये वीजेचा लपंडावही सुरू होता. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हसनगर भागात शनिवारी दमदार पाऊस झाला. कर्जत आणि खोपोली भागातील संततधारेमुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.

राज्यभरात जोर

* दक्षिण गुजरात आणि लगतच्या प्रदेशात तयार झालेल्या चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) स्थितीमुळे दोन दिवस सलग पाऊस कोसळत आहे.

* चक्रवाती वर्तुळाकार स्थितीची तीव्रता रविवारी कमी होणार असली तरी राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा  अंदाज आहे.

* रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

* नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर  जिल्ह्य़ांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि उर्वरीत मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो.

धरण क्षेत्रांत अत्यल्प : ठाणे जिल्ह्य़ाच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. मुरबाड तालुक्यात २४ तासांमध्ये अवघा १९ मिमी पाऊस झाला, तर शहापूर तालुक्यात ४ मिमी पावसाची नोंद झाली. बारवी आणि भातसा जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण नगण्य होते. जलाशयांच्या पाणी पातळीत फारशी वाढ नोंदवण्यात आली नाही.

मुंबई : सांताक्रूझ येथे १११ मिमी तर, कुलाबा येथे ६६ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण मुंबईत दुपारनंतर पाऊस कमी झाला, पण उपनगरांमध्ये मुसळधार सुरूच होती. समुद्राला उधाण आले होते आणि ४.५७ मीटरच्या लाटा उसळत होत्या.

ठाणे : शहरात जोरदार, तर ग्रामीण भागांत पावसाचा जोर कमी होता. संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ात गेल्या २४ तासांत ३७२.६० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात १०१.१२ मिमी पाऊस पडला. उल्हासनगरात ८० मिमी, तर अंबरनाथमध्ये ८३ मिमी पाऊस झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:47 am

Web Title: strong rain in mumbai thanetorrential downpour for the second day in a row abn 97
Next Stories
1 मुंबईपेक्षा ठाण्यात अधिक रुग्ण
2 ‘चतुरंग चर्चा’मध्ये उद्या शिक्षणतज्ज्ञांशी संवाद
3 सनदी लेखापाल परीक्षा १ नोव्हेंबरपासून
Just Now!
X