नेमक्या माहितीमुळे कारवाईत यश; पोलीस महासंचालकांचे मत

गडचिरोली जिल्हा आणि इतर भागातील नक्षलवाद्यांच्या हालचालींची नेमकी माहिती देणारे स्रोत निर्माण करण्यात नक्षलविरोधी अभियानात सहभागी पोलीस, सुरक्षा यंत्रणा यशस्वी ठरल्या आहेत. नेमकी माहिती मिळाल्यानेच रविवारी भामरागड तालुक्यातील जंगलात १६ जहाल नक्षलवाद्यांना ठार मारणे शक्य झाले, असा दावा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुंबईत केला. याच प्रयत्नांमधून गेल्या १६ महिन्यांमध्ये ४२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. त्याचवेळी अद्ययावत प्रशिक्षण, शस्त्रसामग्री, मुबलक दारूगोळा आणि तज्ज्ञ पथकांच्या समावेशातून गेल्या दोन वर्षांमध्ये नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकींमध्ये एकही पोलीस गमावला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी ठार झालेल्या १६ नक्षलवाद्यांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. ११ मृतदेहांची ओळख पटली असून पाच मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठार झालेल्यांमध्ये दक्षिण विभागाचा प्रमुख श्रीनू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रावतू विजेंद्र, पेरमिली दलम प्रमुख डोलेश मादी आत्राम ऊर्फ साईनाथ, अहेरी दलम प्रमुख शांताबाई ऊर्फ मंगली पदा, गट्टा दलमचा नरेश कुटके ऊर्फ राजू ऊर्फ रमेश या चार प्रमुख नक्षलवाद्यांचा समावेश आहे. उर्वरितांमध्ये दामा रायसू नरुटी ऊर्फ राजेश, जन्नी कुळयेटी ऊर्फ सुमन, दुलसा कन्ना नरोटे ऊर्फ नागेश, धर्मू पुंगाटी ऊर्फ तिरुपती, रानू नरोटे ऊर्फ श्रीकांत, बिच्छू गावडे ऊर्फ सन्नू, बाली मडावी ऊर्फ अनिता यांचा समावेश आहे. मृतदेहांजवळ पोलीस पथकाला एके ४७ रायफल, ३०३ रायफल, एसएलआर असा शस्त्रसाठा आढळला. यापैकी श्रीनुविरोधात ८२, साईनाथविरोधात ७५ तर बाली ऊर्फ अनिताविरोधात ४३ गुन्हे दाखल आहेत. या सर्वावर एकूण ७६ लाखांचे इनाम होते. नक्षलवाद्यांचे हे पथक घातपात घडविण्यासाठी नव्हे, तर पोलीस पथकापासून दडण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत होते. गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्हा, सीमावर्ती भागांमध्ये नक्षलवाद्यांची नेमकी माहिती घेऊन पुढे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे नक्षलविरोधी अभियानाचे यश आहे. या माहितीच्या जोरावरच गेल्या १६ महिन्यांमध्ये ४२ नक्षलवाद्यांना ठार मारणे शक्य झाले, असे माथूर यांनी स्पष्ट केले. भविष्यात ही नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र होणार असून त्यांनी शरणागती पत्करावी. त्यामुळे त्यांना मूळ प्रवाहात आणणे शक्य होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. उत्साहाच्या भरात माहिती देताना माथूर यांनी या कारवाईत नक्षलवादी शहीद झाले, असे विधान केले. माध्यम प्रतिनिधींनी ‘शहीद’ या शब्दावरून माथूर यांना प्रतिप्रश्न केला तेव्हा ‘हमने शहीद कर दिये’ असे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.