26 February 2021

News Flash

गृहनिर्माण विभागात बदल्यांचा बाजार

मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्यांसाठी धडपड

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), तसेच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण या स्वायत्त संस्था असल्या तरी या प्राधिकरणाच्या प्रमुखांना आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांच्या बदल्या वा नियुक्त्यांचा अधिकार नाही. हा अधिकार गृहनिर्माण विभागाने आपल्याकडे घेतल्यामुळे सध्या करण्यात आलेल्या नियुक्त्या वा बदल्या पाहता निव्वळ बाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

या दोन्ही प्राधिकरणांत अलीकडे झालेल्या नियुक्त्या व बदल्या या थेट मंत्रालयातून म्हणजे गृहनिर्माण विभागातून झाल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जो मंत्रालयात पोहोचू शकतो त्यालाच मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या मिळत आहेत. या प्रकारामुळे नियुक्त्या-बदल्यांचे डोळे दिपवणारे दरही सध्या ऐकायला मिळत आहेत.

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाची जबाबदारी असलेल्या पुनर्वसन कक्षाचे प्रमुख भूषण देसाई यांची अचानक बदली करून त्यांच्या जागी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातील कार्यकारी अभियंता दामोदर सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमागील ‘अर्थ’कारणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारले तेव्हा या नियुक्तीबद्दल आपण अनभिज्ञ असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

म्हाडातील जवळपास आठ ते दहा कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंत्यांचे आदेशही या विभागाने जारी केले आहेत. महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करताना संबंधित अधिकारी सक्षम आहे का, हे तपासणे आवश्यक असते; परंतु त्याची तमा न बाळगता गृहनिर्माण विभागात सध्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. एकीकडे स्वायत्त संस्था म्हणून म्हाडाला निवृत्तिवेतन वा इतर लाभ द्यायला टाळाटाळ करायची; पण बदल्यांचे अधिकार मात्र आपल्याकडे घेण्याचा दुटप्पीपणा शासनाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

अशाही चर्चा..

* झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले शांतीलाल टाक हे प्राधिकरणात नियुक्ती मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्यावर सध्या कमी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी ते मोक्याची नियुक्ती मिळावी म्हणून मंत्रालयाचे उंबरठे झिजवीत आहेत.

* याशिवाय जलसंधारणसारख्या विभागात असलेले मिलिंद वाणी यांनाही झोपडपट्टी प्राधिकरणाचा मोह सुटला नसल्याचे दिसून येते. उपअभियंता, सहायक अभियंता म्हणून प्राधिकरणातच प्रतिनियुक्तीवर असलेले सुधीर येवले हे कार्यकारी अभियंता म्हणून बढती घेऊन झोपडपट्टी प्राधिकरणातील नियुक्ती कायम करून घेण्यात यशस्वी ठरले आहेत. प्राधिकरणात कोणाचीही प्रतिनियुक्ती केली जाणार नाही, या गृहनिर्माणमंत्र्यांच्या घोषणेलाच गृहनिर्माण विभागाने हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

मी नियुक्त्या वा बदल्यांमध्ये लक्ष घालत नाही. दोन्ही महत्त्वाच्या प्राधिकरणांची कामे वेगाने व्हावीत, अशी माझी भूमिका आहे.

– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:15 am

Web Title: struggle for strategic placements in the housing department abn 97
Next Stories
1 भाविकांसाठी धर्मस्थळे सज्ज
2 मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरी २५५ दिवसांवर
3 सीरियल किलर रमन राघवची दहशत संपवणारे पोलीस अधिकारी अ‍ॅलेक्स फियालोह यांचे निधन
Just Now!
X