विमानतळाप्रमाणेच राज्यभरात दर्जेदार ‘बसतळ’ (बसपोर्ट) उभारण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय चार वर्षांनंतरही कागदावरच राहिला आहे. निविदांमधील किचकट अटी-शर्थी, प्रकल्पांचे सातत्याने बदलणारे आरेखन अशा अनेक कारणांमुळे आजवर बसतळाची एकही वीट रचली गेलेली नाही.

प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, रेस्टॉरंट, वाहनतळ यांसह अनेक सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त २३ जानेवारी २०१६ ला तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रातील प्रमुख अशा १५ शहरांतील बस स्थानकांत विमानतळाप्रमाणेच दर्जेदार असे बसतळ उभारण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमात एसटीच्या पनवेल येथील बस तळाचे भूमिपूजनसुद्धा त्या वेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु एकाही बसतळाचे काम सुरू न करता त्यांची संख्या १५ वरून कमी करून १३ पर्यंत आणली गेली.

भिवंडी, पनवेल, नाशिक महामार्ग, औरंगाबाद, बोरिवली, धुळे, नांदेड, कोल्हापूर, सांगली, अकोला, नागपूर, शिवाजीनगर (पुणे), जळगाव या ठिकाणी बसतळ उभारण्याचे प्रस्तावित आहे. परंतु बांधा-वापरा-हस्तांतरित करा योजनेअंतर्गत बांधले जाणारे बस तळ केवळ ३० वर्षांच्या भाडेपट्टीने देण्याबाबत अट असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक यासाठी पुढे येत नाहीत. तसेच या बसतळ प्रकल्पांचा खर्च १०० ते २०० कोटी रुपये असल्याने व्यावसायिक बांधकाम करणाऱ्या कंपन्या ९९ वर्षांच्या भाडेपट्टीने बांधकाम करण्याची परवानगी मागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही ठिकाणी मेट्रो व एसटी महामंडळ यांच्या संयुक्त खर्चातून बस तळ उभारण्याची संकल्पना पुढे आल्याने शिवाजीनगर (पुणे) येथील बसतळ हे त्याप्रमाणे विकसित करण्याचे ठरवण्यात आले.

उर्वरित बस स्थानकांची निविदा वेळोवेळी प्रसिद्ध करूनही त्याला म्हणावा तसा प्रतिसादही मिळाला नाही. तर पनवेल बस तळाचे भूमिपूजन चार वर्षांपूर्वी होऊनही तेथे कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही.

संख्या १५ वरून १३ वर..

१५ बसतळ उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. यात एसटीचे कल्याण व सोलापूर येथील बस स्थानकांचा समावेश होता. मात्र बस तळाऐवजी त्याचा स्थानक म्हणूनच विकास करण्याचा निर्णय झाला. स्मार्ट सिटीअंर्तगत रेल्वेसोबत कल्याण एसटी बस स्थानकाचा विकास होईल आणि सोलापूरच्या बस तळऐवजी सुसज्ज असे बस स्थानक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल स्थानक व औरंगाबादमधील सिडको बस स्थानकात बसतळाचे काम लवकरच सुरू केले जाईल. प्रकल्पांचे आरेखन काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. त्यामुळे थोडा विलंब झाला. अन्य बसतळ उभारणीसाठीही एसटी महामंडळ प्रयत्नशील आहे.

– रणजिंत सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ