24 October 2020

News Flash

मुंबई विमानतळावरून पुण्यासाठी एसटी सेवा

महामंडळाकडून विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा सुरू

(संग्रहित छायाचित्र)

प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळ आता लवकरच मुंबई विमानतळाला एसटीची जोडणी देणार आहे. विमानाने मुंबईत येणाऱ्या आणि येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना खासगी टॅक्सीशिवाय पर्याय नसतो. अशा प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार केला जात आहे. यासाठी एसटी महामंडळाची मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी चर्चाही सुरू आहे.

विमानाने मुंबईत उतरल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी तत्काळ कोणतीही पर्यायी सेवा उपलब्ध होत नाही. त्यासाठी खासगी टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. खासगी टॅक्सीवाले त्यासाठी अवाच्या सवा दर आकारतात. अशा प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईतून पुण्याला जाणाऱ्या वातानुकूलित एसटी सेवा मुंबई विमानतळाशी जोडण्याचा विचार केला जात आहे.

मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला येथूनही पुण्यासाठी गाडय़ा सुटतात. त्यांचीही जोडणी राष्ट्रीय मुंबई विमानतळाला देण्यात येऊ शकते का, याची चाचपणी केली जात आहे.

बंगळूरु विमानतळाबाहेरही तेथील महानगर वाहतूक महामंडळाने ‘वायु वज्रा’ नावाने वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. विमानांच्या वेळापत्रकाप्रमाणे या बस सेवा विमानतळाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना तत्काळ उपलब्ध होतात. त्यामुळे खासगी टॅक्सींपेक्षा या बसगाडय़ांनाच अधिक प्राधान्य विमान प्रवासी देतात. बंगळूरुच्या धर्तीवर मुंबई विमानतळाबाहेर बससेवा देण्याचा एसटीचा प्रयत्न आहे.

अन्य मार्गासाठी चाचपणी

एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळ प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा केली जात आहे. मुंबई राष्ट्रीय विमानतळाबाहेर एसटी गाडय़ा उभ्या करण्यासाठी जागा देण्यावरून चर्चा करण्यात आली. नेमक्या कोणत्या वेळेत एसटीची वातानुकूलित सेवा मुंबई विमानतळाबाहेर असावी याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार एसटीची सेवा दिली जाणार आहे. बोरिवलीतून पुण्यासाठी वातानुकूलित शिवनेरीच्या बारा फेऱ्या होतात. यातील काही फेऱ्या विमानतळाला जोडण्याचा विचार केला जात आहे. याचबरोबर मुंबई विमानतळाबाहेर पडणारे प्रवासी पुण्याव्यतिरिक्त राज्यातील अन्य कोणत्या शहरात जातात, त्यानुसारही आणखी एसटीची वातानुकूलित सेवा देण्याचाही पर्याय शोधला जात आहे. तीन वर्षांपूर्वी दापोली ते आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ अशी एसटीची सेवा होती; परंतु कमी प्रतिसाद व विमानतळाबाहेर पार्किंग उपलब्ध न झाल्याने ही सेवा बंद झाली. आता पुन्हा एकदा एसटीकडून प्रयोग केला जाणार आहे.

शिवशाहीचाही विचार

शिवनेरीबरोबरच शिवशाही बसगाडय़ांचीही सुविधा मुंबई विमानतळाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना देण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. सध्या एसटीकडे मोठय़ा प्रमाणात वातानुकूलित शिवशाही बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला एक शिवनेरी बस चालवल्यानंतर त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 12:26 am

Web Title: sts new air conditioned service mumbai pune via airport abn 97
Next Stories
1 घरातील शौचालयाचा वाद उच्च न्यायालयात
2 ‘एसी लोकल’ला थंड प्रतिसाद!
3 महापालिकेच्या संकेतस्थळावर मराठीची ऐशीतैशी
Just Now!
X