आईने मोबाइल गेम खेळ न दिल्याने रागाच्या भरात सातवीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सांताक्रुझ येथे घडली. विशेष म्हणजे, आई रागावल्यानंतर ही मुलगी घर सोडून गेली होती. मात्र, त्याच दिवशी रात्री तिच्या पालकांनी तिला शोधून घरी आणले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी वाकोल्यातील रावळपाडा परिसरातील राहणारी होती. आत्महत्येच्या आदल्या दिवशी ती भावंडांसह मोबाइलमध्ये गेम खेळत होती. त्या वेळी तिच्या आईने मोबाइल हिसकावून घेतला. याचा राग आल्याने ही मुलगी घरातून निघून गेली. आईवडील व शेजाऱ्यांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर रात्री याच परिसरात ती सापडली. पालकांनी तिला घरी आणून तिची समजूतही काढली. मात्र, दुसऱ्या दिवशी सायंकाळी तिने घरातच गळफास घेतला. वाकोला पोलिसांनी या प्रकरणी सध्या तरी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

तरुणी घरातून बेपत्ता

अशाच आणखी एका घटनेत, वडिलांनी मोबाइल वापरू न दिल्याने बारावीतील एका विद्यार्थिनी घरातून निघून गेल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. ही मुलगी सतत मोबाइलमध्ये गुंतून असे. समाजमाध्यमांवर मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यातच तिचा वेळ जात असे. ती महाविद्यालयातही वारंवार गैरहजर राहात असल्याची तक्रार महाविद्यालयातून आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचा मोबाइल काढून घेतला. याच रागातून ती १० फेब्रुवारीला घरातून निघून गेली. पोलीस तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, या मुलीने आधीही तीन वेळा घरातून निघून जाण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती हाती येत आहे.