घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मी नगरजवळ रस्ता ओलांडणाऱ्या पालिका शाळेतील तीन विद्यार्थ्यांना गुरुवारी खासगी शाळेच्या बसने धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थी ठार, तर दोघे जखमी झाले. जखमींपैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून जखमींना घाटकोपर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मी नगर मृत्यूचा सापळा बनला असून तेथे वारंवार अपघात होत असतात. पंतनगर मनपा शाळेतील तीन विद्यार्थी येथे रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या एका शाळेच्या बसने या तीन मुलांना धडक दिली. त्यामध्ये अशोक सिद्धप्पा मुरूगन जागीच ठार झाला. या अपघातात अशोकचा भाऊ सुरेश सिद्धप्पा मुरूगन याच्यासह दोन जण जखमी झाले. अपघात झाल्यानंतर तात्काळ या तिघांना घाटकोपर येथील सपना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अशोकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुरेशची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लक्ष्मी नगर येथे वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी येथे भुयारी मार्ग उभारावा, अशी मागणी आपण नगरसेविका झाल्यानंतर २०१२ मध्येच पालिका प्रशासनाकडे केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर १८ नोव्हेंबर २०१५ मध्ये येथे भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे प्रमुख अभियंता (पूल) यांनी सांगितले होते. तत्पूर्वी त्यांनी लक्ष्मी नगर येथे पाहणीही केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते; परंतु अद्याप या भुयारी मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. प्रशासनाने केवळ वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे येथे वारंवार अपघात घडत असून आज एका मुलाला प्राण गमवावे लागले. प्रशासनाच्या निषेधार्थ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका राखी जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.