तरतूद असूनही बँक निश्चिती नाही; महापालिकेची स्पष्टोक्ती

पालिका शाळांमधील विद्यार्थिनींची गळती थांबावी यादृष्टीने प्रशासनाने त्यांना उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उपस्थिती भत्त्याची रक्कम अद्यापही विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे या योजनेला पालिका प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान, बँक निश्चित होऊ न शकल्याने उपस्थिती भत्ता जमा करण्यात आलेला नाही, असी स्पष्टोक्ती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शाळांमधून मुलींची गळती थांबावी आणि शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढवा या उद्दशाने तीन वर्षांपूर्वी विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यांनंतर विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्याची रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. तसेच विद्यार्थिनीचा २०१५ पर्यंतचा उपस्थिती भत्ता ठेवण्याची जबाबदारी कॅनरा बँकेवर जबाबदारी देण्यात आली होती. मात्र २०१५ नंतर ही जबाबदारी स्वीकारण्यास कॅनरा बँकेने नकार दिला होता. परिणामी, २०१५-१६ या शैक्षणिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्याच्या रकमेचे ठेव प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. या संदर्भात अन्य दोन बँकांना विनंती करण्यात आली असून लवकरच बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जुन्या बँकेने जबाबदारी घेण्यास नकार दिल्यानंतर अन्य बँकांची निवड का करण्यात आली नाही. या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी केली आहे.