डहाणू तालुक्यातील दाभोळ येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेतील ३६ विद्यार्थाना शनिवारी अचानकपणे अतिसाराची लागण झाली. या विद्यार्थावर कासा आणि डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा सुरु आहेत. सोमवारी दुपारी राकेश बजरंग आरडी (१३) या विद्यार्थाला उपचारालास दाखल करत असताना त्याचा मृत्यु झाला.
संत गाडगे महाराज आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थाना शनिवार पासून अचानकपणे उलटय़ा, जुलाब आणि चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला होता. विद्यार्थाना तात्काळ ऐंना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे निवासी डॉक्टर नसल्याने या विद्यार्थापैकी २० विद्यार्थाना कासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अन्य १६ विद्यार्थाना डहाणू जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या विद्यार्थाना डायरीयाची लागण झाली असून त्यांच्या पैकी काहींना उपचार करुन सोडून देण्यात आले असल्याची माहिती डॉ. इशांत वानखेडे यांनी दिली. सोमवारी दुपारी एका जीपमधून डहाणू जिल्हा रुग्णालयात राकेश बजरंग आरडी या विद्यार्थाला आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
मात्र मृत विद्यार्था विषयीची कोणतीच माहिती रुग्णालयात उपस्थित असलेल्या आश्रमशाळेचे लिपीक एस.व्ही.महाकाळ यांना देता आली नाही.
 या विद्यार्थाचे पालक असलेल्या बंदु धागडा आणि सुरेश डबका यांच्या म्हणण्यानुसार हे विद्यार्थी विहीरीचे पाणी पीत असून त्या पाण्यात जंतूनाशक औषध (टिसीएल)चे प्रमाण जास्त झाल्याने मुलांना त्रास सुरु झाला होता.
उपचार घेत असलेले विद्यार्थी – महेश तडगे, अशोक महाले, विपिन घडळ, रुपेश सातवी, योगेश कनोजा, अंकुश पिलेना, कुणाल लहांगे, कल्पेश धांगडा, मुकेश पठारा, अश्विनी चौधरी,ऋतीका सुरेश दुबळा, रोहन धांगडा, राहूल लोहार, अमोल आरडी, भावेश वाळसी हे विद्यार्थी कासा रुग्णालयात उपचार घेत आहे. या विद्यार्थाची प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.