रेल्वे रूळ ओलांडण्याची सवय किती भयानक ठरू शकते, याचा प्रत्यय सोमवारी सायंकाळी टिळक नगर स्थानकात प्रवाशांना आला. चेंबूर ते टिळक नगर दरम्यान रेल्वेरूळ ओलांडताना लोकलखाली आलेल्या एका तरुणाचा मृतदेह सुमारे अर्धा किलोमीटर रुळांवरूनच फरफटत गेला. मात्र तो उचलण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना मदत करण्याऐवजी बघ्या प्रवाशांनी या दुर्दैवी घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यात धन्यता मानली.
चेंबूर व टिळक नगर या स्थानकांदरम्यान रोहित बच्चनवाला हा १९ वर्षांचा तरुण रूळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणाऱ्या लोकलने त्याला धडक दिली. या धडकेने रोहितचा मृतदेह गाडीसोबत अर्धा किलोमीटर अंतर फरफटत गेला आणि टिळक नगर स्थानकाजवळ पडला. संध्याकाळी ५.१०च्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना ५.१८च्या सुमारास मिळाली. टिळक नगर स्थानकातील मुख्य बुकिंग क्लार्क गांगुर्डे, रेल्वे पोलीस बाबर व पॉइंट्समन राजू हे घटनास्थळी ५.२१च्या सुमारास पोहोचले.
रोहितचे अवयव सुमारे अर्धा किलोमीटर अंतरात विखुरले होते. हे विदारक दृश्य पाहून मदतीसाठी पुढे येण्याऐवजी प्रवाशांनी त्याचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केल्याने रेल्वेचे कर्मचारीही हवालदिल झाले. अखेर स्थानकातील सुदामा नावाचा बूटपॉलिशवाला मदतीसाठी पुढे आला. रोहितचे दोन्ही हात मिळणे कठीण जात होते. रेल्वेच्या नियमांनुसार सर्व अवयव सापडल्याशिवाय मृतदेह रुग्णालयात नेता येत नाही. अखेर पावणेसहाच्या सुमारास रोहितचे सर्व अवयव गोळा झाल्यानंतर त्याचा मृतदेह शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठवण्यात आला.
‘रेल्वेरूळ ओलांडू नका,’ अशा आशयाच्या जाहिराती करूनही असे प्रसंग घडणे दुर्दैवी आहे. रोहितच्या अपघातातून तरी इतरांनी धडा घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केल़े