– संदीप आचार्य

मुंबईत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई महापालिकेने करोना रुग्ण सेवेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र यासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका पुरेशा संख्येने मिळत नसल्यामुळे पालिका प्रशासनाने त्यांच्याकडील ३५० प्रशिक्षणार्थी परिचारिकांना करोना रुग्णांच्या सेवेसाठी जुंपण्याचा आदेश जारी केला आहेत. या प्रशिक्षणार्थी परिचारिकांपैकी सुमारे १५० परिचारिकांना सेव्हन हिल रुग्णालयात नियुक्तीही देण्यात आली असून कोणत्या नियमाखाली अभ्यासक्रम पूर्ण न केलेल्या परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली असा सवाल परिचारिकांच्या काही संघटनांनी उपस्थित केला आहे. तर आपल्याला करोना संरक्षित पोशाख मिळत नसल्याची या परिचारिकांची तक्रार आहे.

सध्याच्या परिस्थितीत किती परिचारिकांची आवश्यकता आहे याची माहिती पालिका प्रशासनाने घेतली असताना परिचारिकांची तब्बल ४३२ पदे भरण्यातच आलेली नसल्याचे आढळून आले. तसेच अनेक परिचारिका करोना रुग्णांसाठीच्या विशेष रुग्णालयांत काम करण्यास तयार नाहीत. तसेच पन्नास वर्षावरील परिचारिकांना शक्यतो अशा ठिकाणी पाठवू नये असे धोरण प्रशासनाने निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या परिचारिका विद्यालयातील तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ३५० विद्यार्थी परिचारिकांना करोना रुग्णसेवेसाठी नियुक्त करण्याचे आदेश पालिका कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी जारी केले. त्यापैकी सुमारे १५० परिचारिकांना सेव्हन हिल रुग्णालयात कामासाठी पाठविण्यात आले आहे.

आम्हाला पुरेसे करोना संरक्षित पोशाख मिळत नसल्याची तक्रार यातील काही प्रशिक्षणार्थींनी ‘क्लिनिकल नर्सिंग रिसर्च सोसायटी’च्या अध्यक्षा डॉ स्वाती राणे यांच्याकडे केली असून आपण याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्याचे डॉ स्वाती यांनी सांगितले. या प्रशिक्षणार्थी परिचारिकांचे सर्टिफिकेट अजून मिळाले नसताना त्यांना कोणत्या नियमाखाली थेट करोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली असाही सवाल त्यांनी केला. या प्रशिक्षणार्थी परिचारिका व त्यांचे कुटुंब मानसिक तणावाखाली असून त्यांना केवळ स्टायपेंड देण्यात येणार आहे, हा तर उघड अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता व सेव्हन हिल रुग्णालयाची जबाबदारी पाहात असलेले डॉ मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता यातील सत्तरहून अधिक परिचारिकांची राहाण्याची व्यवस्था रेनेसन्स या पंचतारांकित हॉटेलात तर अन्य प्रशिक्षणार्थींची व्यवस्थाही पंचतारांकित हॉटेलात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राहण्या-खाण्यापासून या सर्व प्रशिक्षणार्थी परिचारिकांची उत्तम काळजी घेतली जात असून माझी मुलगी प्रशिक्षणार्थी असती तर तिलाही मी नक्कीच या ठिकाणी काम करण्यास सांगितले असते, असेही डॉ जोशी म्हणाले. सेव्हन हिलमध्ये नियुक्ती करण्यापूर्वी या सर्वांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात करोना रुग्णांचे व्यवस्थापन, अतिदक्षता विभागात काम करणे तसेच व्हेंटिलेटरची माहिती देण्यात आली आहे. सीमेवर लढणारा जवान बंदुक चालवतो, तोच जवान देशातील पूरस्थिती वा अन्य आपत्कालीन काळात रस्ते बांधण्यापासून पडेल ते काम करतो. खरंतर आपत्कालीन काळात कसे काम करायचे हे शिकण्याची एक उत्तम संधी या परिचारिकांना मिळालेली आहे. त्यांनी ही संधी उत्तम प्रकारे साधावी असे माझे मत आहे, असे मतही डॉ मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

सेव्हन हिलमध्ये सध्या ४५० खाटा करोना रुग्णांसाठी राखीव आहेत तर अतिदक्षता विभागात ५० खाटांची व्यवस्था आहे. रोज रुग्ण बरे होऊन येथून जात आहेत तर नवीन रुग्णही रोजच्या रोज येत आहेत. परिचारिकांची निश्चितच कमतरता असून आणखीही मोठ्या प्रमाणात परिचारिका हव्या आहेत. शीव व केईएम रुग्णालयातील डॉक्टरांचे तीन विभाग येथे काम करत आहेत. यात एका न्युरोसर्जनचाही समावेश आहे. खरं तर न्युरोसर्जनचे काम वेगळे असतानाही तो करोना रुग्णांवर उपचार करत असताना परिचारिकांनी मनापासून काम करावे कारण ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी असल्याचेही डॉ जोशी म्हणाले.

या प्रशिक्षणार्थी परिचारिकांना करोना संरक्षित पोशाख मिळत नसतील तर त्याची तात्काळ व्यवस्था केली जाईल तसेच त्यांना अधिकचे मानधन देण्याबाबतही प्रशासन निर्णय घेईल, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. करोनाशी लढणाऱ्या आमच्या आरोग्य व्यवस्थेतील सर्वांची योग्य काळजी आम्ही घेत आहोत. काही प्रश्न नक्कीच आहेत परंतु ते सोडवले जातील, असेही अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.