23 January 2020

News Flash

आयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’

पवईमध्ये मोकाट फिरणाऱ्या एका बैलाने आयआयटीच्या एका विद्यार्थ्यांला शिंगांनी अक्षरश: उचलून फेकले.

पकडण्यास गेलेल्या पालिकेच्या पथकाला विरोध

मुंबई : दोन दिवसांपूर्वी पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (आयआयटी) एका विद्यार्थ्यांला बैलाने उडवल्यामुळे या परिसरात मोकाट फिरणाऱ्या बैलांना पकडण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी गाडी घेऊन गेले असता प्राणिमित्रांनी आणि आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना विरोध केला. दोनपैकी एका बैलाला या जमावाने पळवून लावले; परंतु एका बैलाला पकडण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

पवईमध्ये मोकाट फिरणाऱ्या एका बैलाने आयआयटीच्या एका विद्यार्थ्यांला शिंगांनी अक्षरश: उचलून फेकले. या घटनेत तो विद्यार्थी जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी पालिकेचे कर्मचारी बैलाला पकडण्यासाठी या परिसरात पोहोचले. मात्र पालिकेची गाडी बैलांना पकडण्यासाठी आली आहे, हे समजताच तिथे प्राणिमित्र रहिवासी आणि आयआयटीचे विद्यार्थी जमले व त्यांनी बैलाला पकडण्यास विरोध केला. या नाटय़ामुळे सकाळी या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पकडलेल्या एका बैलाला या जमावाने आयआयटीच्या संकुलात पिटाळून लावले. आयआयटीच्या अधिकाऱ्यांनीही पालिकेच्या कर्मचाऱ्यांना संकुलामध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अखेर पोलिसांची मदत घेतली. या सगळ्या प्रकारात केवळ एका बैलाला पकडण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या वेळी विरोध करणाऱ्या प्राणिमित्रांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

बैलाने एका विद्यार्थ्यांला उडवल्याबाबत कोणतीही तक्रार पालिकेकडे आलेली नाही. तरीही केवळ बातमी वाचून पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तेथील लोकांनी सहकार्य करण्याऐवजी विरोध केल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही धक्काच बसला आहे. असा प्रकार पुन्हा होऊ  नये म्हणून या परिसरात फिरणाऱ्या मोकाट बैलांना पकडणे आवश्यक आहे. पवईच्या रस्त्यावर खूप वाहतूक असते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांना, लहान मुलांना अशा बैलांपासून धोका आहे. तसेच हा बैल आक्रमक का झाला, त्याला काही मेंदू विकार झाला आहे का हे तपासण्यासाठी बैलाला पकडणे आवश्यक आहे. प्राणिप्रेम कितीही योग्य असले तरी ते कसे वागतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्याला पकडणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पकडण्यात आलेल्या एका बैलाला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून तपासणी करून त्याला मालाड येथील पालिकेच्या कोंडवाडय़ात पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

First Published on July 16, 2019 3:29 am

Web Title: student oppose bmc squad to catch ox in iit bombay zws 70
Next Stories
1 एव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच!
2 शहरबात : ठोस पार्किंग धोरणाची गरज
3 पित्याकडून गर्भवती तरुणीची हत्या
Just Now!
X