महाविद्यालयांमध्ये पुढील दोन महिन्यांत विद्यार्थी निवडणुकांची धामधूम रंगणार असून राजकीय संघटना, विद्यार्थी संघटना यांना निवडणुकीत थेट सहभागी होता येणार नसले तरी विद्यार्थी संघटना आता या निवडणुकांसाठी सरसावल्या आहेत. संघटनेचे नाव वापरता येणार नसले तरी महाविद्यालयांमधील आपल्या कार्यकर्त्यांचा शोध, कार्यकर्ते असलेले विद्यार्थी चर्चेत राहावेत यासाठी संघटनांनी तयारी सुरू केली आहे.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये तब्बल २६ वर्षांनी विद्यार्थ्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी विद्यापीठांमध्ये सुरू झाली आहे. या महिनाअखेरीपर्यंत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, तर सप्टेंबरअखेरीपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कोणतीही राजकीय संघटना, पक्षाच्या छत्राखाली कार्यरत असलेल्या संघटना या निवडणुकीत थेट सहभागी होऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पॅनेल तयार करूनही निवडणुका लढवता येणार नाहीत. एखाद्या उमेदवारासाठी कोणत्याही राजकीय संघटनेचा हस्तक्षेप झाला तर त्याची उमेदवारी रद्द करण्याची तरतूद नियमांमध्ये आहे.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी करणाऱ्या संघटनांचा निवडणुकीची नियमावली स्पष्ट झाल्यानंतर काहीसा विरस झाला आहे. मात्र तरीही प्रक्रियेत थेट सहभागी न होता, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणुकीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी कंबर कसली आहे. मोठय़ा महाविद्यालयांमध्ये आपले कार्यकर्ते कोण आहेत, त्यापैकी निवडणुकीसाठी कोण उभे राहू शकेल, या कार्यकर्त्यांचे नाव विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल, याची चाचपणी संघटना करत आहेत.

राजकीय संघटना किंवा विद्यार्थी संघटनांना सहभागी होता येणार नाही. आम्ही या नियमाचे नक्कीच पालन करू. मात्र इतर कोणत्या पक्षाने किंवा संघटनेने या निवडणुकांमध्ये राजकारण केले तर त्याला तोंड देण्याची आमची तयारी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारे कार्यकर्ते माहीत असतात. अशा कार्यकर्त्यांच्या मागे विद्यार्थी उभे राहतात. अशा वेळी संघटनेचे नाव असले किंवा नाही तरी फरक पडत नाही.

– संतोष गांगुर्डे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी  सेना

संघटनांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी बंदी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेच्या आधारेच ही निवडणूक लढवावी लागेल. आमच्या कार्यकर्त्यांपैकी कोणी त्यांच्या कामाच्या बळावर निवडणुकीला उभे राहू शकतील का, हे पाहिले जाईल. जी आचारसंहिता दिली आहे, त्याचे पालन झाल्यास निवडणुका चांगल्या वातावरणात होतील.

– अनिकेत ओव्हाळ, अखिल भारतीय विद्यार्थी संघटना

प्रत्येक महाविद्यालयामध्ये आमचे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. ते काम करत आहेत. संघटनांना सहभागी होता येणार नाही. मात्र काँग्रेस, मनविसे अशा संघटनांबरोबर काम करून विद्यार्थ्यांना त्यांचे प्रतिनिधी मिळावेत यासाठी प्रयत्न करू.

– अ‍ॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस