जिम चालक, डबेवाले, मूर्तीकार आणि कोळी महिला यांच्यापाठोपाठ आता विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज कृष्ण कुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मागच्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. हाच मुद्दा घेऊन समन्वय समितीने आज राज ठाकरेंची भेट घेतली.

अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. कारण प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, त्याचं काय होणार हा सुद्धा मुद्दा आहे.

काही पालकांचा फी वाढीचा सुद्धा मुद्दा होता. राज्य सरकारच्या जीआर नंतरही काही शाळांनी फी वाढ केलीय, असे त्यांचे म्हणणे होते. कोचिंग क्लासेस सुरु करावेत, या मागणीसाठी आज कोचिंग क्लासेसचे मालकही राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. एकूणच समाजातील वेगवेगळया घटकांनी उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची परवागनी मिळावी, यासाठी मागच्या काही महिन्यात राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

‘कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही’
मागच्या आठवडयात राज ठाकरेंनी वीज प्रश्नावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. “आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसंच सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही असं म्हणत टोला लगावला.